‘साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न व्हावेत’, यासाठीची तळमळ साधकांपेक्षा सद्गुरु राजेंद्रदादांमध्येच (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्यामध्येच) अधिक आहे’, असे जाणवते. ‘साधकांच्या प्रयत्नांमध्ये सातत्य रहावे’, यासाठी ‘साधकांना सहज कृतीत आणता येतील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना काढणे, साधकांना प्रोत्साहन देणे, प्रसंगी त्यांचे कौतुक करणे, तसेच प्रायश्चित्त घ्यायला सांगणे’, अशा प्रकारे सद्गुरु दादा त्यांच्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करवून घेतात. ‘हे प्रयत्न ते कसे करवून घेतात ?’, याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
‘साधकांना घडवण्यामध्ये सर्वच गोष्टींचा वापर केल्यास त्याची फलनिष्पत्ती अधिक मिळते’, हेच सद्गुरु दादांनी कृतीतून दाखवून दिले.
१. व्हॉट्सॲपद्वारे प्रतिदिन आढावा घेण्याची सद्गुरु दादांची पद्धत
१ अ. प्रतिदिन आढावा देण्यासाठी व्हॉट्सॲपचा गट सिद्ध करणे : सद्गुरु दादा साधकांचा व्यष्टी साधनेचा प्रत्यक्ष आढावा आठवड्यातून एकदा घेतात; परंतु ‘साधकांचे प्रयत्न प्रतिदिन व्हायला हवेत आणि ‘ते होतात कि नाही ?’, हे सद्गुरु दादांना समजावे’, यासाठी त्यांनी आढावा देणार्या सर्व साधकांचे त्यांच्या आढावागटानुसार व्हॉट्सॲपचे गट केलेले आहेत. या गटात सर्वांनी प्रतिदिन आढावा देण्याची कार्यपद्धत ठेवलेली आहे. या गटात प्रतिदिन आढावा द्यायचा असल्यामुळे सर्वांचे प्रयत्न आपोआपच होतात किंवा एखाद्या दिवशी अल्प झाल्यास त्याची जाणीव होऊन पुढे सुधारणा करण्याचा प्रयत्न होतो.
१ आ. नियोजित वेळेत आढावा न पाठवल्यास त्यावर प्रायश्चित्त घेण्यास सांगणे : व्हॉट्सॲपच्या गटामध्ये नियोजित वेळेच्या नंतर आढावा पाठवला आणि त्याविषयीचे कारण लिहिले नाही, तर ते लगेचच विचारतात. हे स्वभावदोषांमुळे झाले असेल, तर ते त्यासाठी प्रायश्चित्त घ्यायला सांगतात. त्यामुळेही प्रत्येकाला ‘नियोजित वेळेत आढावा पाठवायला हवा’, याची जाणीव होते.
१ इ. स्वयंसूचना सत्रांच्या संख्येवर लक्ष ठेवून त्याविषयी विचारणा करणे : स्वयंसूचना सत्रांची संख्या अल्प होत असल्यास सद्गुरु दादा लगेचच गटामध्ये संदेश पाठवून त्याविषयी विचारणा करतात. त्यातूनही साधकांमध्ये पालट झाला नाही आणि स्वयंसूचना सत्रांची संख्या अल्प होण्याची वारंवारता अधिक असेल, तर ‘ज्या दिवशी स्वयंसूचनांची सत्रे अल्प होतील, त्या दिवशी गटात आढावा पाठवायचा नाही किंवा प्रायश्चित घ्यायचे’, असे ते सांगतात.
१ ई. गटातील चांगले प्रयत्न करणार्या साधकांचे कौतुक करणे : व्हॉट्सॲपच्या गटात एखाद्या साधकाने चांगले प्रयत्न केले असतील, तर ते त्याचे कौतुक करतात. सर्वांचे प्रयत्न चांगले असतील, तर ते सर्वांचे कौतुक करतात. त्यामुळे साधकांचा उत्साह वाढतो.
१ उ. आढावा देणार्या सर्व साधकांचा व्हॉट्सॲपचा सामाईक गट करून त्यात सर्वांसाठी आवश्यक असलेल्या सूचना पाठवणे आणि ठराविक दिवशी सर्वांना त्या गटात आढावा पाठवण्यास सांगणे : सद्गुरु दादांकडे आढाव्यासाठी असणार्या सर्व साधकांचा व्हॉट्सॲपचा एक सामाईक गट केलेला आहे. त्यामध्ये ते सर्वांसाठी आवश्यक असलेल्या सूचना घालतात, तसेच प्रत्येक मासाच्या १, २, ३ आणि १५, १६ या दिनांकांना सर्वांना त्या गटात आढावा पाठवायला सांगतात. यातून सर्वांना ‘कुणाचे काय प्रयत्न चालू आहेत ?’, हे समजते आणि त्यातून शिकता येते. यामध्ये कुणाचे एखादे सूत्र चांगले असेल, तर ते सर्वांना तसा प्रयत्न करण्याविषयी सांगतात.
१ ऊ. आढाव्याच्या आदल्या दिवशी साधकांना स्वभावदोष सारण्या ठराविक वेळेत तपासायला देण्यास सांगणे आणि विलंबाने सारण्या देणार्यांच्या सारण्या न तपासणे : ज्या दिवशी साधकांचा आढावा असतो, त्याच्या आदल्या दिवशी साधकांनी आपापल्या स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाविषयी लिखाणाच्या सारण्या त्यांना तपासायला देण्याची कार्यपद्धत ठेवली आहे. यामध्ये ‘सारण्या किती वाजता तपासायला द्यायच्या ?’, ही वेळ ते सर्व साधकांना विचारून निश्चित करतात. त्या वेळेत सारण्या देण्यामध्ये अडचण असेल आणि ती सांगितली असेल, तर ते सारण्या तपासतात. जर अडचण न सांगता सारण्या विलंबाने दिल्या, तर ते सारण्या तपासत नाहीत. त्यामुळे ‘सारणी सांगितलेल्या वेळेत द्यायला हवी’, याची जाणीव वाढते आणि त्याप्रमाणे कृती होते.
१ ए. प्रयत्नांमध्ये वाढ होण्यासाठी प्रतिमास वेगळे ध्येय ठेवण्यास सांगणे : प्रतिदिन प्रत्येक जण चिंतनसारणीप्रमाणे प्रयत्न करत असतो; परंतु ‘प्रयत्नांमध्ये वाढ व्हावी’, यासाठी सद्गुरु दादा प्रतिमास वेगळे ध्येय ठेवण्यास सांगतात आणि त्याप्रमाणे त्याचा आढावा घेतात. ‘ध्येय ठेवले की, प्रयत्न करायला उत्साह येतो’, या तत्त्वानुसार सर्वांना उत्साही ठेवून ते प्रयत्न करवून घेतात.
१ ऐ. प्रत्येक आठवड्याला गृहपाठ देणे : आढाव्यामध्ये ते प्रत्येक आठवड्याला गृहपाठ देतात. गृहपाठ म्हणजे गटातील साधकांच्या मनाच्या स्तरावरील अयोग्य विचारांमधून बाहेर येण्यासाठीची एक गुरुकिल्लीच आहे. त्यामुळे तो गृहपाठ सर्वांनी करणे अपेक्षित असते.
२. सद्गुरु राजेंद्रदादांनी राबवलेली पद्धत
२ अ. गृहपाठ न करणार्या साधकांसाठी अवलंबलेली पद्धत : साधकांनी गृहपाठ केला नाही, तर ‘त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव व्हावी’, यासाठी त्यांनी पुढीलप्रमाणे पद्धतीचा अवलंब केला आहे.
१. एका गटात साधकांनी गृहपाठ केला नव्हता, तर त्यांनी तो विषय परत घेतला नाही.
२. एका गटामध्ये सर्वांनी गृहपाठ केला नव्हता, तर आढावा न घेता त्यांना गृहपाठ करायला सांगितला.
३. गटातील एका साधकाने गृहपाठ केला नव्हता, तर त्याला आढाव्याला बसू दिले नाही.
४. दुसर्या गटातील एका साधकाने गृहपाठ केला नव्हता, तर त्याला आढाव्यामध्ये गृहपाठाचा विषय चालू असेपर्यंत आढाव्यात बसू दिले नाही.
साधकांच्या स्थितीनुसार प्रायश्चित्त घ्यायला सांगून ते साधकांना अंतर्मुख करतात.
२ आ. साधकाकडून होणार्या गंभीर चुकांसाठी त्याला चुका लिहून खोक्यात घालून मगच पुढील सेवा करण्यास सांगणे : एका साधकाकडून पुष्कळ गंभीर चुका होत होत्या; परंतु त्या साधकाकडून त्या चुका उत्तरदायी साधकांना कळवण्याचा भाग होत नव्हता. त्या वेळी त्या साधकाला प्रतिदिन चुका लिहून खोक्यात घालायला सांगितल्या होत्या; परंतु त्या साधकाकडून तशी कृती सलग दोन आठवडे झाली नाही. त्यानंतर त्यांनी त्या साधकाला आढाव्यातून १५ मिनिटे लवकर सोडले आणि चुका लिहिण्यास सांगितले. ‘चुका लिहून खोक्यात घालून मगच पुढील सेवा करायची’, असे सांगून त्यांनी त्या साधकाकडून कृती करवून घेतली.
२ इ. आढाव्याला विलंबाने येणार्या साधिकेला आढाव्यात ५ मिनिटे उभे रहाण्यास सांगणे : आढाव्याला वेळेपूर्वी ३ ते ४ मिनिटे यायला सांगूनही एक साधिका वेळेत येत नव्हती. आरंभीच्या काही आढाव्यांमध्ये सद्गुरु दादांनी तिला त्याचे कारण विचारले, तसेच वेळेत येण्याविषयी सांगितले; परंतु स्वभावदोषामुळे ती साधिका वेळेत येत नव्हती. १ किंवा २ मिनिटे विलंबाने यायची. ज्या ज्या वेळी तिला यायला विलंब होत असे, त्या त्या वेळी ते तिला आढाव्यात ५ मिनिटे उभे रहाण्यास सांगत. १ – २ आढाव्यांनंतर ती साधिका वेळेत येऊ लागली.
२ ई. व्यष्टी प्रयत्नांत अनियमितता असल्यास ती चूक सर्व सेवांच्या ठिकाणी जाऊन सांगण्यास सांगणे : व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये ६ मासांनंतरही अनियमितता असेल, तर ते ती चूक सर्व सेवांच्या ठिकाणी जाऊन सांगायला सांगतात, जेणेकरून साधकाची अंतर्मुखता वाढेल आणि प्रयत्नांना पुन्हा गतीने प्रारंभ होईल.
३. वयस्कर साधकांना प्रोत्साहन देणे
वयस्कर साधकांनाही ते चुका लिहिण्यास सांगतात. ‘जेवढ्या जमतील तेवढ्या आणि जशा जमतील तशा चुका लिहा’, असे सांगून ते त्यांना प्रोत्साहन देतात अन् अंतर्मुख होण्यास साहाय्य करतात.
४. प्रयत्न न होण्यामागील कारणानुसार उपाययोजना करणे
‘साधकाचे प्रयत्न स्वभावदोषांमुळे होत नाहीत कि आध्यात्मिक त्रासाची तीव्रता अधिक असल्यामुळे होत नाहीत ?’, याचा अभ्यास करून त्रासाची तीव्रता अधिक असेल, तर उपाय वाढवायला सांगून ते प्रयत्न करवून घेतात. स्वभावदोषांमुळे प्रयत्न होत नसतील, तर आढाव्याला बसू नये असे सांगतात.’
– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.६.२०२०)