नगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागामध्ये भीषण आग

कोरोनावर उपचार घेणार्‍या १० रुग्णांचा होरपळून मृत्यू

जिल्हा रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागांना आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत असतांनाही त्याविषयी उपाययोजना न काढणे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक

नगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतीदक्षता विभाग

नगर – येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागात (‘आय.सी.यू.’त) ६ नोव्हेंबर या दिवशी भीषण आग लागली. घटना घडली तेव्हा १७ रुग्ण आय.सी.यू.मध्ये उपचार घेत होते. त्यांपैकी १० जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ७ जण भाजले आहेत. आगीत मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमनदलाने युद्धपातळीवर प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

याविषयी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘‘प्राथमिक माहितीनुसार ‘शॉर्टसर्किट’ झाल्यामुळे आग लागल्याची माहिती मिळाली. मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाइकांना तातडीने सरकारी साहाय्य दिले जाईल, तसेच या घटनेस उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई केली जाईल.’’

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचा आदेश

नगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेच्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचा आदेश दिला.  या हलगर्जीपणास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी, तसेच मुख्य सचिव यांच्याशी बोलून तातडीने ‘उपचाराधीन रुग्णांना उपचार मिळण्यात काही अडचणी येणार नाही ना ?’, ते पहाण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही दिले आहेत. या दुर्घटनेच्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून चौकशीत दोषी आढळणार्‍यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देश सर्व संबंधित विभागांना तात्काळ देण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.