कोरोनावर मात करण्यासाठी ‘मोलनुपिरावीर’ नावाच्या नव्या गोळीची निर्मिती

ब्रिटनकडून मान्यता

लंडन (ब्रिटन) – कोरोना प्रतिबंधात्मक लसींनंतर आता कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी ‘अँटीव्हायरल’ (विषाणूरोधी) गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत.

ब्रिटनने या अँटीव्हायरल गोळीच्या वापराला सर्वप्रथम मान्यता दिली आहे. अमेरिकेतील औषध निर्माते आस्थापन ‘मर्क’ने या गोळ्यांची निर्मिती केली आहे. ‘मोलानुपिरावीर’ असे या गोळीचे नाव आहे. ब्रिटनने ४ लाख ८० सहस्र गोळ्यांची पहिली मागणी या आस्थापनाकडे दिली आहे. सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांवर या गोळ्यांच्या साहाय्याने उपचार करण्यात येणार आहेत.

‘मोलनुपिरावीर’ ही गोळी कोरोना विषाणूला त्याचे स्वरूप पालटण्यापासून रोखते आणि हा आजार हळूहळू अल्प होतो. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर प्रारंभीच्या काळातच या गोळ्या दिल्यास धोका न्यून होतो, तसेच रुग्ण लवकर बरा होतो, असे चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे.