प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालावी !

हिंदु जनजागृती समितीचे पोलीस आणि प्रशासनास निवेदन

अशी मागणी का करावी लागते ? – संपादक

तुळजापूर येथील नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

तुळजापूर (जिल्हा धाराशिव), ४ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालण्याविषयी येथील नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे, तसेच पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश नाईकवाडी, श्री. कौस्तुभ जेवळीकर, श्री. दीपक पलंगे तसेच सनातन संस्थेचे श्री. उमेश कदम आदी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते
धाराशिव येथील फटाक्याचे वितरक महेश चौधरी यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

धाराशिव – येथील उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह फटाक्याचे मुख्य वितरक महेश चौधरी यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष पिंपळे, श्री. भगवान श्रीनामे आदी उपस्थित होते.

लातूर – येथील नायब तहसीलदार भीमाशंकर बरुरे (महसूल विभाग) यांना १ नोव्हेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. गणेश पाटील आदी उपस्थित होते.

सोलापूर – येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालय येथे समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,

१. चिनी फटाक्यांमध्ये विषारी घटकांचे प्रमाण असते. या फटाक्यांमध्ये ‘पोटॅशियम क्लोराइड’, तसेच ‘पोटॅशियम परक्लोराइड’ यांचे रासायनिक मिश्रण वापरले जात असल्यामुळे त्यांच्या वापरावर भारतात बंदी आहे. त्यामुळे चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असले, तरी अत्यंत प्रदूषणकारी असल्याने अवैधरित्या चिनी बनावटीच्या फटाक्यांची विक्री करणार्‍यांवर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.

२. देवतांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने देवतांच्या चित्रांच्या चिंधड्या उडतात, त्यामुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. भारतीय कायद्यांमध्ये ‘धार्मिक भावना दुखावणे’ हाही दंडनीय अपराध आहे, तसेच व्यापारी उत्पादनांवर ‘धार्मिक चिन्ह किंवा चित्र’ छापणे हाही गुन्हा आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याने तक्रार अर्ज देताच दुकानदारांनी देवतांचे चित्र असलेले फटाके हटवले !

सोलापूर – येथील ‘श्री सद्गुरु फटाके’ दुकानचे मालक साठे यांनी श्री लक्ष्मीचे चित्र असलेले फटाके विक्रीला ठेवले होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. संदीप ढगे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे साठे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला. त्यावर पोलिसांनी फटाक्यांची विक्री करणार्‍या दुकानदारांना देवतांची चित्रे असलेले फटाक्यांची विक्री न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर दुकानदारांनी दुकानातील देवतांची चित्रे असलेले फटाक्यांची विक्री न करता काढून ठेवले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव आणि वसगडे येथे निवेदन

कायदा आणि सुव्यवस्था अधिकारी डॉ. विक्रम आवटे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

बेळगाव, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ नोव्हेंबर या दिवशी बेळगाव येथे कायदा आणि सुव्यवस्था अधिकारी डॉ. विक्रम आवटे यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हरेकर, सौ. उज्ज्वला गावडे, धर्मप्रेमी श्री. सदानंद मासेकर उपस्थित होते.

वसगडे (जिल्हा कोल्हापूर) – प्रदूषणकारी आणि देवतांची विटंबना करणार्‍या फटाक्यांवर बंदी घालावी, तसेच धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी अन् असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन १ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वसगडे येथे उपसरपंच श्री. संजय पाटील यांना देण्यात आले. या प्रसंगी धर्मप्रेमी श्री. शिवाजी कोळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर आणि सौ. विजया वेसणेकर उपस्थित होत्या.