केरळ येथील हिंदुत्वनिष्ठ कै. बिनील सोमसुंदरम् हे ‘शबरीमला येथील धर्मपरंपरांचे रक्षण करणार्या समिती’चे क्रियाशील कार्यकर्ते होते. त्यांना काही दिवसांपूर्वी पहाटे एक स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना भगवान अय्यप्पांचे दर्शन झाले. त्यांना आलेली ही अनुभूती येथे दिली आहे. (३.१०.२०२१ या दिवशी बिनील सोमसुंदरम् यांचा निधनानंतरचा दहावा दिवस आहे. – संकलक)
१. भगवान परशुरामाने स्थापन केलेली भगवान अय्यप्पांची केरळ येथील ५ मंदिरे !
‘केरळ येथे भगवान अय्यप्पांची ५ प्रमुख मंदिरे आहेत. या सर्व मंदिरांची स्थापना भगवान परशुरामाने केली आहे. ही मंदिरे पुढीलप्रमाणे आहेत, कुळत्तुपुझा, आर्यन्कावु, अच्छन्कोविल, शबरीमला आणि कांतमला ! या मंदिरांतून भगवान अय्यपांच्या ५ विविध भावमुद्रांचे दर्शन होते.
२. मानवाची सात्त्विकता न्यून झाल्याने ५ मंदिरांतील कांतमला येथील मंदिराचे दर्शन मानवाला न होणे
सध्या या पाचपैकी केवळ चारच मंदिरे पृथ्वीवर आहेत. कलियुगात मानवाची सात्त्विकता न्यून झाल्याने कांतमला येथे असणार्या मंदिराचे दर्शन आपल्याला होत नाही. ‘कांतमला मंदिरस्थित अय्यप्पास्वामींची पूजा प्रत्यक्ष देवता करतात’, असे मानले जाते. हे मंदिर वैकुंठ आणि कैलास यांच्याप्रमाणेच एका सूक्ष्म लोकात आहे.
३. स्वप्नात कांतमला येथील मंदिराचे आणि अय्यप्पास्वामींचे दर्शन घडणे
३ अ. ‘स्वप्नात कुणीतरी स्वतःला उचलून मंदिरात घेऊन गेले’, असे जाणवणे, मंदिराचे बांधकाम अत्यंत दिव्य असणे आणि अय्यप्पास्वामींच्या मूर्तीच्या मुखावर वेगळाच भाव दिसणे : ९.१२.२०२० या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. या स्वप्नात मला कांतमला येथील अय्यप्पास्वामींच्या मूर्तीचे दर्शन झाले. या मंदिराकडे जाण्याचा मार्ग पुष्कळ कठीण होता; मात्र कुणीतरी मला तेथे घेऊन गेले. मला स्वप्नात दोन वेळा देवाच्या मूर्तीचे दर्शन झाले. ‘मार्गात असणार्या सर्व अडथळ्यांना पार करून कुणीतरी मला उचलून मंदिरात घेऊन गेले’, असे जाणवले. या मंदिरात पुष्कळ ऋषिमुनी ध्यानस्थ बसले होते. या मंदिराचे बांधकाम संगमरवरी दगडाचे आणि अत्यंत दिव्य होते. येथे असलेल्या अय्यप्पास्वामींच्या मूर्तीच्या मुखावर एक वेगळाच भाव होता.
३ आ. शरीर चैतन्याने भारित होणे आणि दुपारपर्यंत भावावस्था टिकून रहाणे : मी सकाळी उठल्यावर ‘माझे संपूर्ण शरीर चैतन्याने भारित झाले आहे’, असे माझ्या लक्षात आले. स्वप्नात भगवान अय्यप्पांचे दिव्य दर्शन झाल्यामुळे माझा भाव जागृत झाला आणि ही भावावस्था दुपारपर्यंत टिकून राहिली.
३ इ. भगवान परशुरामाचे वचन ! : ‘जेव्हा पृथ्वीवर धर्माची पुनर्स्थापना होईल, तेव्हा हे मंदिर पुन्हा पृथ्वीवर येईल’, असे भगवान परशुरामाचे वचन आहे.
कृतज्ञता
या वर्षी कोरोना महामारीमुळे मला शबरीमला येथे जाऊन भगवान अय्यप्पांचे दर्शन घेता आले नव्हते; मात्र त्यांनी मला स्वप्नात येऊन त्यांच्या चैतन्यमय रूपाचे दर्शन घडवले, यासाठी मी त्यांचा कोटीशः कृतज्ञ आहे. ‘भगवान अय्यप्पांनी दिव्य दर्शन देऊन मी करत असलेल्या धर्मकार्याला आशीर्वाद दिला’, असे मला वाटते.’
– (कै.) श्री. बिनील सोमसुंदरम्, केरळ (डिसेंबर २०२०)