साधकाच्या प्रश्नांना आपोआप उत्तरे दिली जाऊन स्वत:ची भावजागृती झाल्याचे अनुभवणारे ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. रामानंद परब !

‘एका साधकाने मला पुढील प्रश्न विचारल्यावर कोणताही विचार न करता माझ्याकडून पुढील उत्तरे आपोआप दिली गेली. उत्तरे देऊन पूर्ण झाल्यावर माझ्या अंगावर शहारे येऊन माझा भाव जागृत झाला.

श्री. रामानंद परब

१. मनावर केवळ नामजपाचा संस्कार झाला असेल आणि व्यक्तीचे मन निर्मळ, निर्विचार असेल, तर देव देत असलेले ज्ञान, वैराग्य अन् भक्ती प्रदान करणारे सर्व विचार आणि चैतन्य सहजरित्या ग्रहण करू शकणे

प्रश्न १ : देव आपल्याला पुष्कळ काही द्यायला बसला आहे; पण आपली झोळी रिकामी असावी लागते, यातील ‘पण’ याचा अर्थ काय?

उत्तर : आपली झोळी रिकामी असायला हवी, म्हणजे ‘आपल्या मनात असलेले अयोग्य, अनावश्यक, नकारात्मक विचार, तसेच आपल्यावर झालेले अयोग्य संस्कार, आपल्यामध्ये असलेले स्वभावदोष आणि अहं यांनी जर मन भरलेले असेल, तर देवाने दिलेले चैतन्य अन् विचार आपण ग्रहण करू शकणार नाही. मन ही आपली झोळी आहे. आपले मन निर्मळ असेल, निर्विचार असेल, तर देव देत असलेले ज्ञान आपल्याला समजते आणि ते आपण ग्रहण करू शकतो’, हा याचा अर्थ झाला. देव आपल्याला नेहमी ज्ञान, वैराग्य आणि भक्ती प्रदान करत असतो. ते घेण्यासाठी आपली झोळी रिकामी असायला हवी, म्हणजे मनावर केवळ नामजपाचा (साधनेचा) संस्कार झाला, तर आपले मन रिकामे असू शकते आणि देव देत असलेले सर्व विचार अन् चैतन्य आपण सहजरित्या ग्रहण करू शकतो.

२. देवाच्या चैतन्याचा कृपावर्षाव साधक, संत, सत्संग, दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ग्रंथ अशा विविध माध्यमांतून होत असणे; परंतु साधकाच्या अयोग्य कृती आणि चुका यांमुळे त्याचे चैतन्य न्यून होऊन देव देत असलेले सर्व काही मनाच्या फाटक्या झोळीतून खाली पडणे

प्रश्न २ : देवाने आपल्या झोळीत पुष्कळ दिले आहे आणि ते झोळीतून खाली पडले, तर त्याचा काय उपयोग आहे, म्हणजे काय ?

उत्तर : देवाने आपल्याला पुष्कळ दिले आहे, म्हणजे देवाने आयुष्यात आपल्याला अनेक गोष्टी दिल्या आहेत. जन्मल्यापासून ते आतापर्यंत अनेक वेळा देवाने आपले प्राण वाचवले आणि पुनर्जन्म दिला. आपल्याला साधना करायला शिकवली. अनेक सेवांत विविध गोष्टी शिकवल्या. अनेक जन्मांचे प्रारब्ध भोगायला शक्ती दिली आणि अजूनही भोगण्यासाठी शक्ती देत आहे, म्हणजेच  देव सगळे आपल्यासाठी करत आहे आणि अजूनही आपल्याला देत आहे. साधक, संत, सत्संग, दैनिक ‘सनातन प्रभात’, ग्रंथ यांच्या माध्यमांतून देव देत असलेले चैतन्य हा कृपेचा आपल्यावर होणारा वर्षावच आहे, म्हणजे त्याने आपल्या झोळीत हे सर्व घातलेच आहे; पण आपणच आपल्यात असलेल्या दोषांमुळे, अयोग्य विचारांमुळे, आपल्याकडून होत असलेल्या अयोग्य कृतींमुळे आणि चुकांमुळे आपल्यातले चैतन्य न्यून करतो. याचा अर्थ देव देत असलेले सर्व काही झोळीतून खाली पाडल्यासारखेच आहे.

– श्री. रामानंद परब, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.११.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक