सण-उत्सवांच्या कालावधीत फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून अन्नपदार्थ विकत घ्यावेत ! – मोहन केंबळकर, साहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन

‘सुराज्य अभियान’ आणि ‘आरोग्य साहाय्य समिती’ या उपक्रमांच्या अंतर्गत ‘अन्नभेसळ कशी ओळखावी अन् त्यासाठीचे उपाय’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

श्री. मोहन केंबळकर

मुंबई – दिवाळीसारख्या सणाच्या वेळी मिठाईवर चांदीऐवजी ॲल्युमिनियमचा वर्ख लावला जातो. मिठाईमध्ये, तसेच गुळासारख्या पदार्थांमध्ये खाण्याच्या रंगांचा अतीवापर केला जातो. बाजारामध्ये अन्नपदार्थ तळण्यासाठी वापरण्यात येणारे खाद्यतेल केवळ ३ वेळाच वापरले गेले पाहिजे; मात्र असे न होता अनेकदा मिठाई व्यावसायिक आणि रस्त्यावरील खाद्यविक्रेते खाद्यतेल काळपट होईपर्यंत वापरतात. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून अन्नपदार्थ विकत घ्यावेत. पॅकबंद पदार्थ घेतांनाही त्यातील घटक, त्या पदार्थांची ‘एक्स्पायरी डेट’ (पदार्थ वापरण्याची मुदत) आदी गोष्टी पाहूनच ते पदार्थ घ्यावेत. अन्नपदार्थांचा दर्जा चांगला असावा, यासाठी प्रशासन लक्ष देत असते; मात्र सण-उत्सवांच्या कालावधीत फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहून अन्नपदार्थ विकत घ्यावेत, असे आवाहन कोल्हापूर येथील अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त श्री. मोहन केंबळकर यांनी केले. ते ‘आरोग्य साहाय्य समिती’ आणि ‘सुराज्य अभियान’ यांच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी झालेल्या ‘अन्न भेसळ कशी ओळखावी अन् उपाय ?’ (भाग २) या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

या कार्यक्रमात सातारा आणि कोल्हापूर येथील जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेचे कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी श्री. सुनील पाखरे आणि त्यांचे सहकारी यांनी खवा, केशर, डाळी आदी पदार्थांमधील भेसळ कशी ओळखावी ? हे प्रात्यक्षिकांसह दाखवले. हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. वैभव आफळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. १ सहस्र ३६२ जणांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

श्री. मोहन केंबळकर यांनी मांडलेली अन्य सूत्रे

१. सध्या ‘चायनीज’ (चिनी) पदार्थांमध्ये, तसेच काही पॅकबंद पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘अजिनोमोटो’चा वापर केला जातो. अजिनोमोटोयुक्त पदार्थांचे सेवन शरिराला हानीकारक असून यामुळे आतड्याचे विकार, ॲसिडिटी, पचनाचा त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनी अशा पदार्थांचे सेवन करणे शक्यतो टाळावे.

२. दूषित वातावरणात अन्नपदार्थ बनवल्याचे आढळल्यास, भेसळयुक्त पदार्थ समवेत बाळगल्यास, तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थाच्या सेवनाने कुणाचा मृत्यू झाल्यास अथवा व्यक्तीला शारीरिक त्रास किंवा आजार झाल्यास अशा अनेक गुन्ह्यांसाठी अन्न सुरक्षेविषयीच्या विद्यमान कायद्यांनुसार दोषींच्या विरोधात शिक्षेच्या तरतुदी अस्तित्वात आहेत. या संदर्भातील गुन्ह्यांसाठी आर्थिक दंड, कारावास आदी शिक्षा आहेत. नागरिकांना कुठल्याही प्रकारची भेसळ आढळल्यास त्यांनी ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’च्या केंद्रीय विभागाला १८००११२१०० आणि महाराष्ट्रात १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी.

श्री. सुनील पाखरे यांनी पदार्थ भेसळयुक्त आहे का ? हे ओळखण्याच्या संदर्भात सांगितलेली सूत्रे

श्री. सुनील पाखरे

१. खव्यामधील भेसळ कशी ओळखावी ?

खव्यामध्ये पाणी मिसळावे. ते मिश्रण एकजीव करून त्यात ‘आयोडिन टिंचर’ घालावे. खव्याला निळा रंग आल्यास खवा भेसळयुक्त असतो.

२. केशरमधील भेसळ कशी ओळखावी ?

नारळ आणि मका यांच्या तंतूंना रंग लावून त्याची केशरमध्ये भेसळ केली जाते. केशर भेसळयुक्त आहे का ? हे ओळखण्यासाठी केशर पाण्यात घालावे. खरे केशर विरघळते, तर भेसळयुक्त केशर पाण्यात विरघळत नाही, तसेच भेसळयुक्त केशरचा रंगही नाहीसा होतो.