गोरखपूर (उत्तरप्रदेश) – येत्या साडेतीन वर्षांत भारत हिंदु राष्ट्र बनेल, असे प्रतिपादन पुरी येथील गोवर्धन पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले. ते सध्या गोरखपूर येथे धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
तीन से चार वर्षों में भारत बन जाएगा हिन्दू राष्ट्र : शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीhttps://t.co/aEs6p285n5
— ETV Bharat Jharkhand (@ETVBharatJH) October 29, 2021
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी पुढे म्हटले की,
१. भारताच्या फाळणीनंतर भारताला हिंदु राष्ट्र घोषित न करणे हे शासन आणि राजकीय पक्ष यांच्या दिशाहीनतेचे दर्शक आहे. आता स्थापन होणार्या हिंदु राष्ट्राची तुम्ही समीक्षा करू शकता, त्याकडे पहात राहू शकता किंवा त्यात सहभाग घेऊ शकता.
२. भारतातील नेते धर्म आणि नीती समजत नाहीत. देशात राजकीय नेत्यांची कमतरता नाही; मात्र राजकीय व्याख्येविषयी ते अज्ञानी आहे. अशा नेत्यांकडून आपण देशातील प्रतिष्ठ, सुरक्षितता, संपन्नता आणि चांगल्या समाजाची निर्मिती यांविषयी काय अपेक्षा करणार ? उन्माद, ‘फुट पाडा आणि राज्य करा’ ही नीती अवलंबणे किंवा सत्ताप्राप्त करणे म्हणजे राजकारण नाही, तर व्यक्ती आणि समाज यांना स्वावलंबी आणि सुसंस्कृत बनवण्यासाठी जी नीती अवलंबली जाते, त्याला राजकारण म्हणतात.
३. महाभारत, मत्स्यपुराण, अग्नि पुराण आदींमध्ये म्हटले आहे की, राजकारणचे दुसरे नाव राजधर्म आहे. नीती आणि धर्म हे त्याचे पर्यायी शब्द आहेत.
४. ‘हिंदु शब्दाला कोणता पर्यायी शब्द योग्य आहे ?’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शंकराचार्य म्हणाले की, त्यासाठी सनातनी, वैदिक, आर्य आणि हिंदु या चारही शब्दांचा वापर करता येऊ शकतो. हिंद महासागर, हिंदुकुश, हिंदी, हिंदू हे सर्वच प्राचीन शब्द आहेत. पुराण आणि ऋग्वेद यांमध्ये हिंदु शब्दाचा वापर करण्यात आला आहे.