राजधानी देहलीत वर्ष २०१३ ते २०१९ या कालावधीत गुन्ह्यांमध्ये २७५ टक्क्यांनी वाढ !

  • देशाच्या राजधानीमध्ये ही स्थिती असेल, तर अन्य राज्ये आणि शहरे येथील स्थिती काय असेल, याची कल्पना येते ! – संपादक
  • देशातील गुन्हेगारी अधिकाधिक अल्प करणे आवश्यक असतांना ती प्रतिदिन वाढणे, म्हणजे देशातील नागरिक, त्यांची संपत्ती असुरक्षित होत चालली आहे, याचेच हे दर्शक आहे. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपररिहार्य करते ! – संपादक
  • हा आहे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याचा परिणाम ! आता तरी सरकार जनतेला साधना शिकवण्यासाठी प्रयत्न करील का ? – संपादक

नवी देहली – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग आणि नियंत्रक अन् महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या अहवालानुसार वर्ष २०१३ ते २०१९ या कालावधीत देहलीत गुन्ह्यांमध्ये २७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्ष २०१३ मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या ८६ सहस्र ८०० इतकी होती, तर वर्ष २०१९ मध्ये ही संख्या २ लाख ९९ सहस्र ४७५ इतकी झाली. ‘कॅग’च्या अहवालानुसार या वाढत्या गुन्हेगारीमागे पोलिसांकडे असलेल्या साधनसुविधांची कमतरता, हे कारण आहे.

१. वर्ष २०१९ मध्ये देहलीत ५ सहस्र १८५ गुन्हे नोंदवण्यात आले. वर्ष २०१३ मध्ये ही संख्या ४ सहस्र १५९ इतकी होती.

२. वर्ष २०१९ च्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये देहलीत बलात्काराच्या घटनांत ४३ टक्क्यांनी वाढ झाली. यासह १ सहस्र ७१२ घटना पती आणि सासर यांच्याकडून महिलेचा छळ केल्याच्या होत्या, तसेच ५६ प्रकरणांत हुंड्यासाठी हत्या करण्यात आली होती.

३. वर्ष २०११ मध्ये भारतीय दंड विधानाच्या अंतर्गत देहलीमध्ये एकूण ५३ सहस्र ३५३ गुन्हे नोंदवण्यात आले. १५ ऑगस्ट २०२१ मध्ये ही संख्या १ लाख ७५ सहस्र २७ इतकी झाली.

४. देहलीत वृद्धांच्या संदर्भात वर्ष २०२० मध्ये ९०६ गुन्हे नोंदवण्यात आले. देशातील १९ शहरांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे.