वेंगुर्ले शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ वर पडलेले झाड अखेर ५ मासांनंतर हटवले

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलांवर व्हरांड्यात बसण्याची आली होती वेळ !

ही आहे प्रशासनाची कार्यक्षमता ! – संपादक

वेंगुर्ले – शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ च्या इमारतीवर पडलेले झाड

वेंगुर्ले – शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ च्या इमारतीवर पडलेले झाड अखेर २८ ऑक्टोबरला ५ मासांनंतर तोडण्यात आले. १६ मे या दिवशी तौक्ते वादळामुळे वडाचे मोठे झाड शाळेच्या इमारतीवर पडले होते. हे झाड काढण्याविषयी प्रशासनाला अर्ज, निवदने देऊन आणि विनंत्या करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे शाळा चालू झाल्यावर मुलांवर व्हरांड्यात बसण्याची वेळ आली होती.

४ ऑक्टोबरपासून इयत्ता ५ वीपासूनचे वर्ग चालू करण्यास शासनाने मान्यता दिली होती; मात्र शाळेच्या इमारतीवरील झाड काढेपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला होता. तरीही प्रशासनाने लक्ष न दिल्याने मुलांची शैक्षणिक हानी नको; म्हणून पालकांनी मुलांना शाळेच्या व्हरांड्यात बसवून वर्ग चालू करण्यास सांगितले. (यातून मुलांच्या पालकांना मुलांच्या शिक्षणाची काळजी आहे; मात्र प्रशासनाला त्याविषयी काहीही वाटत नाही ! ही विद्यार्थ्यांविषयीची असंवेदनशीलताच आहे ! – संपादक)

याची नोंद घेऊन वेंगुर्ले नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर यांनी शाळा क्रमांक २ ची शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी, वेंगुले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी २७ ऑक्टोबरला चर्चा केली आणि २८ ऑक्टोबरला ते झाड तोडण्यात आले.

शाळेवर पडलेले झाड वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या मालकीचे असल्याने ते ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने तोडायचे कि पंचायत समिती प्रशासनाने ? असा प्रश्‍न निर्माण झाला होता; मात्र उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर यांनी पुढाकार घेतल्याने तो प्रश्‍न निकाली निघाला.