३१.८.२०२१ या दिवशी श्री. भास्कर रघुनाथ खाडिलकर हे ‘बँक ऑफ इंडिया’च्या वाडा, देवगड येथील अधिकोषातून मुख्य व्यवस्थापक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. अधिकोषातील सर्व कामेही अतिशय दायित्वाने पूर्ण करणे
१ अ. सतत शिकण्याच्या स्थितीत राहून अधिकोषाचा व्यवसाय वाढवणे : ‘वर्ष १९८४ मध्ये त्यांना ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये कारकून (क्लार्क) या पदावर नोकरी मिळाली. अधिकोषातील मुख्य व्यवस्थापकांसमवेत राहून ते तेथील सर्व कामे शिकले आणि पुढाकार घेऊन सर्व कामे केली. अधिकोषाच्या ग्राहकांना अधिकोषाच्या सर्व योजना समजावून सांगून चांगली सेवा देत होते. ते ग्राहकांशी बोलतांना त्यांचे निरीक्षण करायचे आणि त्यांचे ‘धडाडी किंवा होतकरूपणा’, असे गुण हेरून त्यांना अधिकोषातून ऋण (कर्ज) देत होते. त्यामुळे ग्राहकांचा अधिकोषाशी असलेला व्यवहार वाढत गेला. उद्योग आणि व्यवसाय यांसाठी त्यांनी कितीतरी जणांना प्रोत्साहन देऊन उभे करण्याचा प्रयत्न केला.
१ आ. अधिकोषाची बंद होऊ लागलेली शाखा पुन्हा पूर्ण प्रयत्नाने चालू करणे : त्यानंतर त्यांची अधिकारी (ऑफिसर) म्हणून पदोन्नती झाली. त्या वेळी त्यांना मिठबाव (तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील शाखा मिळाली. अधिकोषाची ही शाखा बंद होण्याच्या मार्गावर होती. ती पुन्हा चालू झाली. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात श्री. खाडिलकर यांचा सिंहाचा वाटा होता.
१ इ. देवगड येथे सर्व सुखसोयींनी युक्त अशी नवीन शाखा चालू करण्याचे पूर्ण दायित्व यशस्वीरित्या पार पाडणे : नंतर त्यांचे देवगड येथे स्थानांतर झाले. येथे नवीन शाखा उघडण्यासाठी जागा बघण्यापासून ते सर्व प्रकारे आधुनिक अशी देवगड येथील अधिकोषाची शाखा चालू करण्याचे दायित्व त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले.
२. लहानपणापासून केलेली दत्तभक्ती !
त्यांचे मूळ गाव कुरुंदवाड (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर). लहानपणी ते प्रतिदिन सायकलने कुरुंदवाडहून नरसोबाच्या वाडीला जायचे आणि ओलेत्याने (ओल्या वस्त्रांनिशी) ‘दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।’, हा मंत्र म्हणत देवळाभोवती प्रदक्षिणा घालायचे. त्यांना अनेक वेळा दत्तक्षेत्री जाण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी अनेक वेळा गुरुचरित्राचे पारायणही केले आहे. त्यांनी दत्तक्षेत्री पूजा, उत्सव, अभिषेक आणि अन्नदान केले आहे. त्यांना ‘बँक ऑफ इंडिया’च्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर झालेल्या मुलाखतीत ‘दत्तांची तीन प्रसिद्ध क्षेत्रे सांगा’, हा एकच प्रश्न विचारला होता. त्यांनी त्याचे उत्तर दिल्यावर त्यांची मुलाखत संपली आणि निवडही झाली होती. त्यामुळे त्यांना ‘मला मिळालेली ही नोकरी हा दत्तगुरूंचा प्रसाद आहे आणि नोकरीच्या कार्यकाळातील सर्व यश त्यांनी ठेवलेल्या ईश्वरी अधिष्ठानामुळे मिळाले’, असे वाटते.
३. सनातन संस्थेशी संपर्क आणि नंतर केलेल्या अनेक प्रकारच्या सेवा
वर्ष २००० पासून ते सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना आणि सेवा करतात. त्यांनी ‘नामजप करणे, सत्संगाला उपस्थित रहाणे, स्वतः अर्पण देणे’, अशी व्यष्टी साधना केली आणि ‘समाजातून प्रायोजक घेणे, विज्ञापने घेणे, वर्गणीदार करणे, दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांच्या वितरणाच्या समवेत उत्पादन साहित्य वितरण करणे, ग्रंथप्रदर्शन कक्षावर सेवा करणे, रात्रीच्या वेळी प्रसारासाठी कापडी फलक (‘बॅनर’) लावणे, भित्तीपत्रके चिकटवणे, साधकांना वैयक्तिक संपर्क करणे, त्यांच्या अडचणी ऐकून घेऊन साधकांना साहाय्य करणे’, अशा सर्व प्रकारच्या समष्टी सेवा केल्या. गुरुकृपेने त्यांना अनेक संत आणि सद्गुरु यांचे मार्गदर्शन अन् आशीर्वाद लाभले आहेत.
४. इतरांचा विचार करणे
अधिकोषात काम करतांनाही ते प्रत्येकाला उत्तर देत असत. ‘मी कामात आहे. नंतर बघू’, असे ते कधीही सांगत नसत. ते नेहमीच सर्वांना साहाय्य करतात आणि इतरांचा विचार करतात.
५. ‘मुलीनेही साधना करून ईश्वरप्राप्ती करावी’, यासाठी तिला आश्रमात सेवेसाठी पाठवणे
आमची मुलगी (आताची सौ. पूर्वा कुलकर्णी) हिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘तिने नोकरी करावी’, अशी आधी त्यांची अपेक्षा होती; मात्र साधनेचे महत्त्व कळल्यावर यजमानांनी तिच्या हितासाठी तिला आश्रमात जाऊन सेवा करण्यास सांगून तिच्याकडून तशी कृती करून घेतली. त्यांनी तिला गुरुकृपेला पात्र होण्याचा मार्ग दाखवला.
त्यांच्यामध्ये ‘अडचणींवर मात करणे, उपाययोजना काढणे, कधीही न चिडणे, त्रागा न करणे, प्रचंड संयम, सहनशीलता, तहानभूक विसरून कार्य करणे’ इत्यादी अनेक गुण आहेत.
‘आता सेवानिवृत्तीनंतर यजमानांनी अधिक जोमाने साधना करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी अधिक प्रयत्नशील रहावे’, अशी कृपाळू गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी प्रार्थना करते.’
– सौ. भाग्यश्री भास्कर खाडिलकर (पत्नी, वय ५८ वर्षे), देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (३१.७.२०२१)