लातूरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद !

लातूर – लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत १९ जागांसाठी ११७ आवेदने प्रविष्ट करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी ७० उमेदवार मैदानात असून भाजपच्या वतीने प्रविष्ट करण्यात आलेले सर्व अर्ज निवडणूक अधिकार्‍यांनी बाद ठरवले आहेत. काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांचे अर्जही बाद ठरले आहेत. बेबाकी प्रमाणपत्र (थकबाकी नसल्याचा दाखला) आणि अन्य कागदपत्रे काढतांना विरोधी उमेदवारांना अडचणी आल्या. छाननीच्या दिवशीच बाकी भरल्याने भाजपच्या अनेक उमेदवारांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बाद ठरवला. सहकार बोर्डाची थकबाकी असल्यासही उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.

याविषयी भाजपचे रमेश कराड यांनी सांगितले की, सत्ताधार्‍यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. याची तक्रार आम्ही राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करणार आहोत, तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असून यात अर्ज बाद करणार्‍या सरकारी यंत्रणेच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करण्याची अनुमती मागणार आहोत.