अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील ! –  सी.डी.एस्. जनरल बिपिन रावत

जनरल बिपिन रावत

गुवाहाटी (आसाम) – अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे जम्मू आणि काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील. त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला सिद्ध राहिले पाहिजे. त्यासाठी आपल्या सीमा बंद करणे, देखरेख करणे आणि टेहाळणी करणे, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बाहेरून देशात कोण येत आहे ?,  याकडे आपले लक्ष असले पाहिजे. येणार्‍यांची तपासणी करायला हवी, असे प्रतिपादन ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सी.डी.एस्.) जनरल बिपिन रावत यांनी येथे एका कार्यक्रमात केले. ‘नागरिकांना अंतर्गत सुरक्षेविषयी जागृत करण्याची आवश्यकता आहे’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

जनरल रावत पुढे म्हणाले की,

१. सामान्य नागरिक आणि पर्यटक यांना या कडेकोट तपासणीचा त्रास होईल; मात्र हे सर्व त्यांच्या सुरक्षेसाठी आहे, हे त्यांना समजून घ्यावे लागेल. आपल्या सुरक्षेसाठी कुणीही येणार नाही, आपल्यालाच स्वतःचे, आपल्या लोकांचे आणि आपल्या संपत्तीचे रक्षण करावे लागेल. देशाची अंतर्गत सुरक्षा हा आपल्यासाठी काळजीचा विषय आहे. याला तोंड देण्यासाठी आपल्याला नागरिकांना प्रशिक्षित करावे लागेल.

२. देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचे कर्तव्य समजल्यास आपण देशाची अंतर्गत सुरक्षा राखू शकू. नागरिकांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेविषयी त्यांच्या कर्तव्याचे पालन करावे. प्रत्येक नागरिकाने त्याचे कर्तव्य बजावले, तर आपल्याला या परिस्थितीचा सामना करता येईल.

३. तुमच्या शेजारी कोण लोक येऊन रहातात ?, याविषयी तुम्हाला ठाऊक असले पाहिजे. आपण सतर्क असलो, तर कोणताही आतंकवादी आपल्या शेजारी येऊन राहू शकत नाही. कुणालाही काहीही संशयास्पद वाटले, तर नागरिकांनी प्रश्‍न विचारले पाहिजे, तसेच त्याविषयी पोलिसांना माहिती दिली पाहिजे.