१. ‘अग्निहोत्र करतांना वास्तूच्या चारही बाजूंना संरक्षककवच निर्माण व्हावे आणि आम्हा सर्वांचे रक्षण व्हावे’, अशी प्रार्थना होणे
‘काही मासांपूर्वी आम्ही घरी अग्निहोत्र करण्यास आरंभ केला. घरी अग्निहोत्र करत असतांना माझी अशी प्रार्थना होत असे, ‘आमच्या वास्तूच्या चारही बाजूूंना संरक्षककवच निर्माण व्हावे आणि आम्हा सर्वांचे रक्षण व्हावे.’
२. कोरोना रुग्ण असलेल्या विभागामध्ये सेवा मिळाल्यावर समष्टीसाठी प्रार्थना होणे
काही दिवसानंतर मला कोरोना रुग्ण असलेल्या विभागामध्ये वैद्यकीय सेवा मिळाली. त्या वेळी मी ८ दिवस घरी राहू शकणार नव्हते. तेव्हा विचार केला की, त्या वेळी मी न्यूनतम प्रार्थना तरी करू शकते. नंतर आपोआपच असे झाले की, आमच्या वास्तूच्या चारही बाजूंना संरक्षककवच निर्माण व्हावे, असे न म्हणता मी ‘पृथ्वीच्या सर्व बाजूंनी संरक्षककवच निर्माण व्हावे, सर्व साधक आणि सर्व प्राणी यांचे रक्षण व्हावे’, अशी प्रार्थना होऊ लागली.
३. व्यष्टी प्रार्थना करण्यापेक्षा समष्टीचा विचार आणि समष्टीसाठी प्रार्थना करणे अधिक योग्य असल्याचे मार्गदर्शनात परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे
मी ही गोष्ट आईला सांगितल्यावर ती म्हणाली, ‘‘आपली एवढी साधना नाही आणि एवढी पातळीही नाही की, आपण संपूर्ण पृथ्वीसाठी प्रार्थना करावी.’’ या प्रसंगाविषयी सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांनी सुचवले दोघींचाही विचार योग्य आहे. आईचा विचार व्यष्टी स्तरावर आणि तुझा समष्टी स्तरावर आहे; परंतु समष्टीचा विचार करणे अधिक योग्य आहे.’
४. प्राणवायू पुरवठा करणार्या आस्थापनाच्या अभियंत्यांनी रुग्णालयाची पहाणी करून ‘प्राणवायू वापरण्याची गती अधिक आहे आणि इमारतीत हवा खेळती रहाण्याची व्यवस्था योग्य नसल्यामुळे विभागात कोणत्याही वेळी आग लागू शकते’, असे सांगणे
कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या काळात कोरोना रुग्णसंख्या पुष्कळ वाढत होती. तेव्हा प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करणार्या आस्थापनाच्या अभियंत्यांनी रुग्णालयाची तपासणी केली आणि व्यवस्थापकांना लिखित सूचना दिली होती, ‘येथे प्राणवायू वापरण्याची गती अधिक आहे आणि इमारतीत हवा खेळती रहाण्याची व्यवस्था योग्य नसल्यामुळे विभागामध्ये कोणत्याही वेळी आग लागू शकते. देशातील अन्य काही शहरांच्या रुग्णालयातसुद्धा अशा प्रकारच्या दुर्घटनांच्या बातम्या आल्या आहेत.’
५. सूर्यदेवाचे दर्शन घेऊन भावप्रयोग केल्यावर केंद्रीय प्राणवायू पुरवठ्याचे ठिकाणी लक्ष जाणे, प्राणवायू अधिक प्रमाणात सोडला जात असून त्याला एकही नळी जोडलेली नसल्याचे लक्षात येणे आणि अभियंत्यांनी जाणीव करून दिलेल्या गंभीर परिस्थितीतून गुरुदेवांनीच रक्षण केल्याचे जाणवणे
कोरोनाच्या या सेवेच्या काळात एक दिवस माझी रात्रपाळी होती. सकाळी ५ वाजता मी उठून विभागाच्या काचा लावलेल्या ठिकाणी गेले. माझ्या मनात ‘तिथून मला सूर्यदेवाचे दर्शन घेता येईल’, असा विचार आला. नंतर मी सूर्याला प्रार्थना करून भावप्रयोग केला आणि अग्निहोत्राची मानस आहुतीसुद्धा दिली. कृतज्ञता व्यक्त करून मी पुन्हा आपल्या सेवेच्या ठिकाणी परतले, तर माझे लक्ष केंद्रीय प्राणवायू (ऑॅक्सिजन) पुरवठा करणार्या ठिकाणी (Outlet) गेले. त्यातून प्रती मिनिटाला १५ लिटर प्राणवायूचा पुरवठा होत असल्याचे मला दिसले; परंतु त्या ठिकाणी एकही नळी लावलेली नव्हती आणि त्यातून कोणत्याही रुग्णाला प्राणवायू पुरवठा होत नव्हता. त्याच्याजवळ असलेल्या पलंगावर बर्याच काळापासून रुग्णही नव्हता. वातावरणात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्राणवायू पसरला आणि कुठेही ठिणगी पडली, तर आग लागण्याची शक्यता होती. (ही गोष्ट आस्थापनाच्या अभियंत्यांनीही लक्षात आणून दिली होती.) त्यामुळे मी तो पुरवठा बंद करून परिचारिकेच्या लक्षात आणून दिले आणि तिला सांगितले, ‘‘सर्व ठिकाणी याची गांभीर्याने तपासणी करून यापुढे यावर जातीने लक्ष ठेवा.’’
परात्पर गुरुदेव आणि अग्निदेवता यांना प्रार्थना केल्यावर त्यांनी लक्षात आणून दिले अन् घडू शकणार्या मोठ्या संकटापासून आम्हाला वाचवले. या प्रसंगावरून माझ्या लक्षात आले, ‘भावसत्संगात जसे सांगितले होते की, ‘आपत्काळात पंचमहाभूते आमचे रक्षण करणार आहेत’, त्याची प्रत्यक्ष अनुभूती मला आली. त्यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– आधुनिक वैद्या (कु.) श्रिया साहा, कोलकाता
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |