‘एफ्.ए.टी.एफ्.’ने पाकिस्तानसमवेत तुर्कस्तानलही घातले करड्या सूचीमध्ये !

(‘एफ्.ए.टी.एफ्.’ म्हणजेच ‘दी फायनँशियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ नावाची जागतिक संघटना ही आंतकवादाला आर्थिक पुरवठा करणारे आणि काळा पैसा पांढरा करणार्‍यांच्या विरोधात जागतिक धोरण ठरवण्याचे अन् ते अवलंबण्याचे कार्य करते.)

पाकचे पंतप्रधान इम्रान खान व तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जागतिक संघटना ‘दी फायनँशियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ने (‘एफ्.ए.टी.एफ्.’ने) पाकिस्तानला करड्या सूचीमध्ये (‘ग्रे लिस्ट’मध्ये) कायम ठेवत आता त्यामध्ये तुर्कस्तानचाही समावेश केला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानला करड्या सूचीमधून बाहेर काढण्यासाठी तुर्कस्तानचे प्रयत्न चालू होते. या दोन्ही देशांना आता अन्य देशांकडून, तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून आर्थिक साहाय्य मिळणे कठीण होऊ शकते.

‘एफ्.ए.टी.एफ्.’चे अध्यक्ष डॉ. मार्क्स प्लिअर

पाकने याविषयी आरोप करतांना म्हटले, ‘एफ्.ए.टी.एफ्.’ने भारताच्या दबावाखाली येऊन आमच्या विरोधात हे पाऊल उचलले आहे.’ (भारतद्वेषाची कावीळ झालेला पाकिस्तान ! स्वतःच्या कुकर्माची फळे पाकला मिळत असतांना भारतावर आरोप करून तो जगासमोर हास्यास्पदच ठरत आहे, हे त्याला समजेल तो सुदिन ! – संपादक) ‘एफ्.ए.टी.एफ्.’ने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. ‘एफ्.ए.टी.एफ्.’चे अध्यक्ष डॉ. मार्क्स प्लिअर म्हणाले की, ‘पाकिस्तान आतंकवादी आणि त्यांच्या संघटना यांच्या विरोधात गांभीर्याने कारवाई करत आहे, असे त्याला दाखवावे लागणार आहे. ‘एफ्.ए.टी.एफ्.’मध्ये निर्णय सर्वसंमतीने होतात.’