पूरग्रस्तांच्या प्रश्नावर २९ ऑक्टोबरला सांगलीत ‘चक्का जाम’ आंदोलन ! – पृथ्वीराज पवार, भाजप 

पृथ्वीराज पवार, भाजप

सांगली – पुराचे संकट कायमस्वरूपी हटवण्यासाठी उपाययोजना झाल्या पाहिजेत. पूरग्रस्तांना वाटप करण्यात आलेली रक्कम तुटपुंजी आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या प्रश्नावर २९ ऑक्टोबरला सांगलीत ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी चेतावणी भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी दिली. भाजपच्या वतीने दैवैज्ञ भवन येथे महाविकास आघाडी सरकारने सांगलीतील व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक यांना अपुरे साहाय्य केल्याच्या निषेधार्थ ‘पूरग्रस्त संवाद मेळावा’ घेण्यात आला. त्या वेळी ही चेतावणी पवार यांनी दिली.

या वेळी पूरग्रस्त आंदोलन समितीचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, ‘‘सरकारने पूरग्रस्तांना भीक द्यावी इतके अल्प साहाय्य केले आहे. पूरग्रस्तांचा लढा आता सभागृह आणि रस्त्यावर असे दोन्हीकडे लढला जाईल. पूरग्रस्तांना साहाय्य मिळवून दिल्याविना भाजप शांत रहाणार नाही.’’ या वेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, दीपक माने यांसह अन्य पदाधिकार्‍यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात पूरग्रस्त व्यापारी, नागरिक, शेतकरी यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या.