गुरुदेवांप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर जीवनातील कठीण प्रसंगांत स्थिर रहाणारे रामनाथी आश्रमातील श्री. सुनील सोनीकर (वय ५४ वर्षे) !

आश्विन कृष्ण पक्ष तृतीया (२३.१०.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणारे श्री. सुनील सोनीकर यांचा ५४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. सुनील सोनीकर

श्री. सुनील अंकुश सोनीकर यांना ५४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. यजमानांवर लहानपणी चांगले संस्कार होणे

‘माझे यजमान श्री. सुनील यांच्यावर त्यांच्या वडिलांनी (कै. अंकुश सोनीकर यांनी) स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे संस्कार केले. यजमानांवर अजूनही त्या संस्कारांचा पगडा आहे. ते शाळेत एक ‘हुशार आणि आदर्श विद्यार्थी’ म्हणून ओळखले जायचे. लहानपणापासूनच यजमानांची सात्त्विक आणि धार्मिक वृत्ती असल्याने समोरील व्यक्ती त्यांच्याशी आपोआपच आदराने बोलते.

२. कष्टप्रद जीवन

यजमानांच्या घरची स्थिती बिकट असल्याने त्यांचे अभियांत्रिकी शिक्षणाचे १ वर्षे राहिले असतांना त्यांना शिक्षण सोडून नोकरी करावी लागली. त्यांनी घरच्यांना पैसे पाठवून आधार दिला. त्यांनी स्वतः काटकसर करून दिवस काढले.

३. यजमानांना अध्यात्म आणि सेवा यांची आवड असणे

यजमानांचा कल अध्यात्माकडे होता. त्यांच्यामुळेच मला अध्यात्माची गोडी लागली. वर्ष २००३ मध्ये एका सत्संगाच्या माध्यमातून सनातन संस्थेत आल्यानंतर त्यांना ‘अनेकातून एकात’ आल्याचा आनंद झाला. त्यांनी प्रासंगिक सेवा करायला आरंभ केला आणि त्यातून त्यांना आनंद मिळत गेला. ते पाहुण्यांना किंवा कोणत्याही व्यक्तीला साधनेचे महत्त्व सांगत असतांना समोरची व्यक्ती न कंटाळता यजमानांचे बोलणे आत्मीयतेने ऐकत असे. काही जण सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ घेत असत.

४. गुरुदेवांप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर जीवनातील कठीण प्रसंगांत स्थिर रहाणे

४ अ. गुरुदेव आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्यावर श्रद्धा ठेवून प्रतिकूल परिस्थितीत नोकरी करणे अन् व्यष्टी साधना करणे : यजमानांच्या कार्यालयातील वातावरण अत्यंत रज-तमात्मक होते. अशाही स्थितीत त्यांचा व्यष्टी साधना चालू ठेवण्याचा प्रयत्न असे. यजमान अंतःकरणापासून प.पू. भक्तराज महाराज आणि गुरुदेव यांना तळमळीने हाक मारत असत. केवळ गुरुदेवांवर असलेल्या अपार श्रद्धेमुळेच प्रतिकूल वातावरणात यजमान टिकून राहिले.

४ आ. पत्नीला त्रास होत असतांना ‘गुरुदेवच सर्व करवून घेतात’, असा भाव ठेवून घरातील सर्व कामे करणे : माझ्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांत वाढ झाल्यास माझ्यात काहीच करण्याची क्षमता नसे. त्या कालावधीत यजमान साधना म्हणून घरातील कामे करून कार्यालयात जात असत. त्यांना कार्यालयातून सुटी मिळत नसे. तेव्हा त्यांची प्रचंड धावपळ होत असे. अशा वेळी ते गुरुदेवांना आत्मनिवेदन करत. ‘सर्व गुरुदेवच करवून घेतात’, अशी त्यांना अनुभूतीही यायची.

४ इ. साधिका गंभीर आजारातून वाचल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितल्यावर यजमानांचा कृतज्ञताभाव जागृत होणे आणि यजमानांनी आधुनिक वैद्यांना सनातन संस्थेचे कार्य सांगितल्यावर ‘ईश्वरी शक्तीपुढे विज्ञान थिटे आहे’, असे आधुनिक वैद्यांनी मान्य करणे : एकदा माझ्या डाव्या पायावर उकळते तेल सांडून माझा पाय भाजला आणि पायाला जंतूसंसर्ग झाला. अशातच माझ्या दाढेलाही जंतूसंसर्ग झाला. माझी दाढ अयोग्य पद्धतीने काढली गेल्याने माझ्या मेंदूच्या नसेला (शिरेला) धक्का लागला. परिणामी असह्य वेदनेमुळे माझी अवस्था बिकट झाली होती. त्याही स्थितीत यजमान शांत आणि स्थिर राहिले. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘तुमची पत्नी गंभीर आजारातून चमत्कार झाल्याप्रमाणे वाचली.’’ ते ऐकून यजमानांच्या डोळ्यांतून कृतज्ञताभावाने अश्रू आले. आधुनिक वैद्यांनी त्याचे कारण विचारल्यानंतर यजमानांनी त्यांना ‘गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) महानता आणि संस्थेचे कार्य’ यांविषयी सांगितले. तेव्हा आधुनिक वैद्यांचाही भाव जागृत होऊन त्यांनी मान्य केले की, ‘ईश्वरी शक्तीपुढे विज्ञान थिटे आहे.’

सौ. स्वाती सोनीकर

५. नोकरी गेल्यावर व्यवसाय करणे

५ अ. पाणीपुरी आणि भेळ विकण्याचे लहानसे दुकान चालू करणे : ५.२.२०१४ या दिवशी यजमानांची नोकरी गेली. त्याही स्थितीत ते गुरुकृपेने शांत आणि स्थिर होते. तेव्हा त्यांच्या मनात ‘येईल त्या परिस्थितीला तोंड देणे आणि परिस्थितीत गुरुदेवांना अनुभवणे’ एवढाच विचार होता. त्यांनी पाणीपुरी आणि भेळ विकण्याचे लहानसे दुकान चालू केले. त्यांना तेथेही अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्या वेळी ते शिकण्याच्या आणि सकारात्मक स्थितीत राहिले. पुढे दुकानाभोवतीचा परिसर चांगला नसल्याने त्यांना दुकान बंद करावे लागले.

५ आ. परिस्थितीचा स्वीकार करून वडिलांची मनोभावे सेवा करणे : त्यातच सासर्‍यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्यांच्या सेवेसाठी वेळ देणे आवश्यक होते. यजमानांनी परिस्थिती स्वीकारून वडिलांची मनोभावे सेवा करण्याला प्राधान्य दिले.

५ इ. यजमानांनी खानावळ चालू करणे आणि ‘केटरिंग’चा (खाद्यपदार्थ बनवण्याचा) ‘कोर्स’ केल्यानंतर अनुभव येण्यासाठी एका उपाहारगृहात नोकरी करणे : यजमानांच्या मित्राची खानावळ असल्यामुळे यजमानांनी त्याच्या मार्गदर्शनानुसार खानावळ चालू केली. खानावळ चालवण्याचा अनुभव नसतांना ‘गुरुदेवच मित्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत’, असा यजमानांचा भाव होता. नंतर त्यांनी ‘केटरिंग’चा (खाद्यपदार्थ बनवण्याचा) ‘कोर्स’ केला. मी आणि माझी मुलगी स्नेहल खानावळ चालवत होतो. त्यानंतर यजमानांना एका उपाहारगृहात काम करण्याची संधी मिळाली.

५ उ. हातगाडीवर वडा-पाव विकण्याचा व्यवसाय चालू केल्यावर तेथे आलेल्या जिज्ञासूंना साधना सांगणे आणि हा व्यवसाय करतांना झालेला त्रास

५ उ १. हातगाडीवर वडा-पाव विकण्याचा व्यवसाय प्रामाणिकपणे करणे आणि तेथे भेटणार्‍या जिज्ञासूंना साधना सांगून सात्त्विक उत्पादनांचे वितरण करणे : यजमान उपाहारगृहात नोकरी करत असतांना त्यांची पुष्कळ धावपळ होत होती; म्हणून त्यांनी हातगाडीवर (‘श्रीकृष्ण वडापाव’) वडा-पाव विक्रीचा व्यवसाय चालू केला. हा व्यवसाय त्यांनी ‘लोकांना चांगले पदार्थ खायला मिळावे’, हे लक्षात ठेवून केला. हळूहळू लोकांना ठाऊक झाले की, ‘श्रीकृष्ण वडापाव’ गाडीवर उत्तम चवीचे आणि चांगले पदार्थ मिळतात.’ त्यामुळे लोक दूरवरून येत. यजमान त्याचे सर्व श्रेय गुरुदेव आणि अन्नपूर्णामाता यांना देत. तेथे कुणी जिज्ञासू भेटले, तर यजमान त्यांना साधना सांगून सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे वितरण करत.

५ उ २. हातगाडीवर वडा-पाव विकणे चालू केल्यावर एक राजकारणी व्यक्ती, पोलीस आणि अन्य गाड्यांचे मालक यांनी त्रास देणे अन् केवळ साधनेच्या बळावर यजमान कठीण परिस्थितीत टिकून रहाणे : आम्ही हातगाडीवर वडा-पाव  विकण्याचा व्यवसाय चालू केल्यावर एक राजकारणी व्यक्ती, पोलीस आणि अन्य गाड्यांचे मालक यांचा त्रास हळूहळू वाढत गेला. अतिक्रमण हटवणारी यंत्रणा इतरांची हातगाडी न उचलता आमचीच हातगाडी उचलत असे. त्यामुळे आमची हानी होत असे. यजमानांना अधिकार्‍यांना पैसे (हप्ते) देण्यासाठी सक्ती केली जात असे; पण त्यांनी कुणालाही पैसे दिले नाहीत. त्या परिसरात अन्य बरेच अनैतिक आणि अवैध धंदे चालत होते. त्यात सहभागी होण्यासाठी यजमानांना सांगण्यात आले. यजमान ८ दिवस गुरुदेवांना तळमळीने प्रार्थना करून मार्गदर्शन करण्यासाठी आत्मनिवेदन करत असत. शेवटी यजमानांनी निर्णय घेऊन पोलिसांना ठामपणे नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी मानसिक त्रास देणे बंद केले. केवळ साधनेच्या बळावर यजमान अशा कठीण परिस्थितीत टिकून राहिले.

६. यजमानांनी साधना चालू केल्यावर त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू न्यून झाले.

७. भाव

७ अ. परात्पर गुरु डॉक्टरांचे केवळ नाव ऐकले, तरी यजमानांच्या डोळ्यांत अश्रू येतात.

७ आ. रामनाथी आश्रमात स्वयंपाकघरात सेवा मिळाल्याबद्दल कृतज्ञता वाटणे : यजमानांना ‘केटरींग’चा व्यवसाय केल्यानंतर ५ वर्षे अतिशय कष्ट करावे लागले. आता त्यांना वैकुंठरूपी रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा मिळाली आहे. यजमानांचा ‘गुरुदेवांनी त्यांचे प्रारब्ध फेडले आणि साधनेच्या मार्गाला लावले’, असा भाव असतो.

७ इ. आता त्यांचे मन निरासक्त झाले आहे. ‘मला केवळ देवच हवा’, अशी त्यांची धारणा झाली आहे. त्यांची आश्रम सोडून कुठेही जायची इच्छा नसते.

‘हे गुरुदेवा, मला यजमानांच्या सान्निध्यात राहून त्यांच्यातील गुण केवळ आपल्याच कृपेमुळे अनुभवता आले. त्यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. स्वाती सुनील सोनीकर (पत्नी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक