सांगोला साखर कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी ५७ लाख रुपये वाटले !

शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा गौप्यस्फोट

केवळ साखर कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी लाखो रुपये वाटावे लागत असतील, तर नगरसेवक, आमदार, खासदार या पदांच्या निवडणुकांसाठी किती रुपयांचे वाटप होत असेल, याची कल्पना येते. पैसे वाटून निवडून येणारे उमेदवार कधी विधायक कार्य करू शकतील का ? – संपादक 

शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील

सांगोला (जिल्हा सोलापूर) – सांगोला साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख यांच्याकडे ‘माझे काही संचालक घ्या’, असा प्रस्ताव ठेवला होता. त्या वेळी (कै.) गणपतराव देशमुख यांनी वेळ निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर मी सभासदांना देहली, हरियाणा, तसेच पंजाबमधील लुधियाना येथून विमानाने आणले. एवढेच नाही, तर सभासदांना ३ सहस्र रुपये वाटप केले. निवडणुकीच्या कालावधीत १ सहस्र ७०० सभासदांना कोल्हापूर येथे ठेवले. त्या ठिकाणी त्यांना मटण आणि मासे यांची मेजवानी दिली, पत्ते खेळण्यासाठी लागणारे पैसेही दिले. त्या काळात मी ५७ लाख रुपये वाटून कारखान्याची निवडणूक लढवली, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला.

सांगोला सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला आमदार शहाजी बापू पाटील आणि तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. या वेळी आमदार पाटील यांनी कारखान्याच्या उभारणीमध्ये कुणी कसा गैरकारभार केला ? याची उदाहरणे देत म्हणाले, ‘कारखान्याच्या दुरवस्थेला माझ्यासह सर्वच नेते उत्तरदायी असून मी शेतकर्‍यांची क्षमा मागतो.’ आमदार पाटील यांच्या गौप्यस्फोटानंतर राज्यातील सहकारी साखर कारखान्यांत चालणार्‍या गैरकारभाराचे सत्य समोर आले आहे. (पैसे वाटून किंवा विविध आमिषे दाखवून निवडणुका जिंकणार्‍या नेत्यांच्या हातात सत्ता गेल्यास काय अवस्था होते ? हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. – संपादक)