सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेचे सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार

जिल्हा प्रशासन आणि पदाधिकारी संगनमताने काम करत असल्याचा आरोप

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

सिंधुदुर्ग – जिल्हा परिषद अधिनियम आणि शासन यांचे निर्णय न पाळणार्‍या अन् दबावाखाली काम करणार्‍या अधिकार्‍यांना खडसावण्यासाठी ३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांची भेट घेणार आहेत. याविषयीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप नारकर यांनी नायर यांना दिले.

नारकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पदाधिकारी आणि प्रशासन संगनमताने चुकीच्या पद्धतीने गेली अनेक वर्षे काम करत आहेत. याविषयी कोकण आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे, तरीही विविध सूत्रांमध्ये जाणीवपूर्वक चुका गेल्या जात आहेत. यामध्ये जिल्हा परिषद स्वनिधीचे वाटप करत असतांना विरोधी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी सुचवलेल्या कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत काही सूत्रांवर शिवसेनेच्या सदस्यांनी आक्षेप नोंदवून ठाम विरोध दर्शवला आहे. याविषयीचा ठराव कोकण आयुक्त आणि शासन यांना पाठवावा, असे सुचवले होते; मात्र प्रशासनाकडून जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे.

१४ जुलै २०२१ या दिवशी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ‘वॉटर प्युरिफायर’ खरेदीत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना केलेली असतांना अद्यापही त्याचा अहवाल दिलेला नाही. अशा विविध सूत्रांवर वारंवार पत्रव्यवहार करून आणि सभागृहामध्ये आवाज उठवूनही प्रशासन त्याची नोंद घेत नाही.