संभाजीनगर येथील कर्णपुरादेवी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा !  – अंबादास दानवे, आमदार, शिवसेना 

अंबादास दानवे

संभाजीनगर – ‘शहराचे ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरादेवी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा’, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे १५ ऑक्टोबर या दिवशी केली. ‘कर्णपुरा येथील देवीचे मंदिर ४०० वर्षे जुने आहे. नवरात्रोत्सवात येथे १० दिवस यात्रा भरते. त्यामुळे भाविकांच्या सुविधेसाठी आता सरकारी साहाय्याची आवश्यकता आहे’, असेही ते म्हणाले. ‘प्रतिवर्षी कर्णपुरा येथील बालाजीच्या रथाची मिरवणूक दसर्‍याच्या दिवशी काढली जाते; मात्र कोरोनामुळे ही मिरवणूक गेल्या वर्षीपासून रहित करण्यात आली आहे’, अशी माहिती मंदिराचे पुजारी आमदार अंबादास दानवे यांनी दिली.

राजा कर्णसिंग यांनी कर्णपुरादेवी मंदिर उभारले !

छावणी परिसरातील कर्णपुरादेवी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. शहराची ग्रामदेवता म्हणून कर्णिकामातादेवीची ओळख आहे. नवरात्रोत्सवात या मंदिरात लाखो भाविकांची गर्दी होते. राजस्थानातून आलेल्या कर्णसिंग राजाने या मंदिराची उभारणी केली आहे. दानवे कुटुंबांची सातवी पिढी या मंदिराचे पुजारी म्हणून काम पहात आहे. राजस्थानातील बिकानेर येथील राजा कर्णसिंग वर्ष १८३५ मध्ये शहरात वास्तव्यासाठी आले होते. छावणी परिसरातील कर्णपुरा येथे त्याचे वास्तव्य होते. ते राजस्थान येथील कर्णिकामातेचे भक्त होते. या ठिकाणीही कर्णिकामातेचे मंदिर बांधायचे त्यांनी ठरवले. त्यानंतर या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.