महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘ॐ निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी साधकांना आलेल्या अनुभूती

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ‘ॐ निर्विचार’ हा नामजप ऐकण्याच्या प्रयोगात सहभागी झालेल्या साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

५ ते ११.७.२०२१ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर (संगीत विशारद) यांच्या आवाजात ‘ॐ निर्विचार’ हा नामजप ध्वनीमुद्रित करण्यात आला. त्यानंतर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले साधक, आध्यात्मिक त्रास असलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेले ६० टक्के अन् त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचे साधक, असे एकूण १८ साधक अन् संत यांना ७ दिवस प्रतिदिन १० मिनिटे ऐकवण्यात आला. त्या वेळी या प्रयोगात सहभागी झालेल्या काही साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

या प्रयोगासंबंधी करण्यात आलेले संशोधन वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/?p=519537&preview=true

‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप करण्याचे महत्त्व !

‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते, तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः ।’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. तेजल पात्रीकर

१. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकाला आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

एक साधक

६.७.२०२१ या दिवशी आलेल्या त्रासदायक अनुभूती

अ. ‘नामजप ऐकायला आरंभ केल्यावर माझ्या छातीवर दाब जाणवू लागला.

आ. नामजप संपेपर्यंत माझ्या छातीत वेदना होत होत्या. त्यानंतर ३-४ घंटे माझ्या छातीत पुष्कळ दुखत होते.

११.७.२०२१ या दिवशी आलेल्या चांगल्या अनुभूती

अ. प्रयोगाच्या वेळी

१. ‘माझे पूर्ण शरीर हलके झाले आहे’, असे मला जाणवत होते.

२. माझ्या दोन्ही नाकपुड्यांतून श्वासोच्छ्वास चालू झाला. (‘सर्वसामान्य व्यक्तीचा एका वेळी प्रामुख्याने एका नाकपुडीतून श्वासोच्छ्वास चालू असतो.’ – संकलक)

३. ‘नामजपातील चैतन्य माझ्या संपूर्ण शरिरात, म्हणजे तळपायांपासून डोक्यापर्यंत परिणाम करत आहे आणि माझ्या देहाची शुद्धी करत आहे’, असे मला जाणवत होते.

४. मला उत्साह जाणवत होता, तसेच ‘माझ्या देहामध्ये पोकळी आहे’, असे मला जाणवत होते.

५. माझे आज्ञाचक्र आणि सहस्रारचक्र यांवर पुष्कळ परिणाम होऊन तेथील सूक्ष्मातील वाईट शक्ती नष्ट झाल्याचे मला जाणवले.

आ. प्रयोगानंतर

१. माझे मन शांत होते.

२. माझ्याकडून उपायांसाठीचा नामजप आपोआप होत होता.

३. रात्री मला शांत झोप लागली.’ (११.७.२०२१)

२. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

कु. म्रिणालिनी देवघरे

५.७.२०२१ या दिवशी आलेल्या त्रासदायक अनुभूती

अ. ‘सकाळपासून मला पुष्कळ निरुत्साह जाणवत होता. मला ‘काहीच करू नये’, असे वाटत होते.

आ. नामजप चालू झाल्यावर माझ्या मनात सतत अनावश्यक विचार येत होते. २ मिनिटांनंतर माझे मन नामजपावर एकाग्र झाले.

आलेल्या चांगल्या अनुभूती

अ. ‘नामजप माझ्या शरिरात जात आहे आणि शरिरावर असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होत आहे, तसेच शरीर आतून हलत आहे’, असे मला जाणवले.

आ. नामजप ऐकल्यानंतर माझे मन उत्साही झाले. मला थकवा आणि निरुत्साह जाणवत नव्हता. सकाळच्या तुलनेत मला पुष्कळ चांगले वाटत होते.

६.७.२०२१ या दिवशी आलेल्या चांगल्या अनुभूती

१. नामजप चालू झाल्याक्षणी माझ्या शरिरात एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली. तेव्हा मला तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवले.

२. माझे शरीर आतून जोराने हालत होते. थोड्या वेळाने माझे ध्यान लागले.

१०.७.२०२१ या दिवशी आलेल्या चांगल्या अनुभूती

१. सकाळपासून माझे मन उत्साही आणि आनंदी होते.

२. नामजप ऐकतांना आरंभी ‘शक्तीची स्पंदने माझ्याभोवती निर्माण होत आहेत’, असे मला जाणवले.

३. थोड्या वेळाने मला माझ्या सहस्रारचक्राच्या ठिकाणी आणि त्यानंतर हळूहळू आज्ञाचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवू लागल्या. नंतर माझ्या अनाहतचक्राच्या ठिकाणी तेजतत्त्वाची स्पंदने जाणवू लागली आणि ‘तेथून ती संपूर्ण देहात पसरत आहेत’, असे मला दिसत होते.

४. माझे शरीर आतून हलत असल्याचे मला जाणवले. ते प्रथम थोड्या गतीने गोल फिरत होते. नंतर ती गती न्यून झाली. माझे डोके उजव्या बाजूला झुकले आणि माझे ध्यान लागले. ध्यानात मला ‘ॐ निर्विचार’ हा नामजप मोठ्या अक्षरांत उंचावर दिसत होता.

११.७.२०२१ या दिवशी आलेली चांगली अनुभूती

नामजप ऐकतांना माझे ध्यान लागले आणि माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या.’ (११.७.२०२१)

कु. सुखदा गंगाधरे

५.७.२०२१ या दिवशी आलेल्या चांगल्या अनुभूती

१. ‘नामजप चालू झाल्यावर ‘आरंभी विशुद्ध आणि नंतर अनाहत अन् मणिपूर या चक्रांच्या ठिकाणी हालचाल होत आहे’, असे मला जाणवले.

२. काही वेळाने माझे मन नामजपावर एकाग्र झाले. त्या वेळी माझ्या मनात कोणताच विचार नव्हता. मला मनाची निर्विचार स्थिती साधारण १ मिनिट अनुभवता आली.

३. माझे डोळे बंद होते; पण मला माझ्या डोळ्यांसमोर मधे मधे निळा आणि पांढरा प्रकाश दिसत होता. ‘माझ्या शरिराभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण घटत आहे’, असे मला जाणवले.

४. प्रयोग संपल्यावर माझा ‘ॐ निर्विचार’ या नामजपाऐवजी ‘निर्विचार’ हा नामजप होत होता.

६.७.२०२१ या दिवशी आलेल्या चांगल्या अनुभूती

१. मासिक पाळीमुळे सकाळपासून माझे ओटीपोट आणि पाय यांत वेदना होत होत्या, तरीही माझ्या मनाची स्थिती बरी होती. नामजप चालू झाल्यापासून तो संपेपर्यंत मला वेदना जाणवत नव्हत्या. ही स्थिती नामजप संपल्यानंतर साधारण ५ मिनिटांपर्यंत टिकून होती. त्यानंतर माझ्या वेदनांत वाढ झाली.

२. नामजप चालू असतांना ‘माझ्या शरिराभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होत आहे’, असे मला जाणवले.

३. मला माझ्या सहस्रारचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवत होत्या.

४. माझ्या मनातील कृतज्ञतेचे विचार वाढले.

५. नामजप संपल्यानंतरही ‘मला आध्यात्मिक लाभ होत आहे’, असे मला जाणवले.’ (११.७.२०२१)

३. आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीच्या साधकांना आलेल्या चांगल्या अनुभूती

श्री. मनोज कुवेलकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)

५.७.२०२१

१. ‘नामजप करत असतांना आरंभी मला माझ्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी ‘ॐ’ दिसत होता. नंतर मला शक्ती जाणवू लागली. त्यानंतर मला हलके वाटू लागले.

२. नंतर मला विविध प्रकारच्या शिवपिंडी दिसू लागल्या आणि त्यानंतर माझे ध्यान लागले.

७.७.२०२१

माझ्या सहस्रारचक्राच्या ठिकाणी ‘ॐ’ दिसत होता. थोड्या वेळाने माझे ध्यान लागले.

११.७.२०२१

१. नामजपाच्या आरंभी प्रार्थना करतांना मला परात्पर गुरुदेवांचे चरण आणि त्यानंतर श्री दुर्गादेवीचे विराट रूप यांचे दर्शन झाले. त्या वेळी मला पुढील दृश्य दिसले, ‘मी परात्पर गुरुदेवांचे चरण आणि श्री दुर्गादेवी यांच्यासमोर बसून नामजप करत आहे. त्यांच्या मागे पुष्कळ ढग असून त्यांमधून वाईट शक्ती माझ्याकडे पहात आहेत. माझ्या आज्ञाचक्रातून प्रकाश बाहेर पडत आहे आणि तो त्या वाईट शक्तींवर प्रक्षेपित झाल्याने त्या शक्ती नाहीशा होत आहेत.’

२. शेवटी माझे ध्यान लागले आणि ध्यानात मला परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाले.’

श्री. प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)

११.७.२०२१

१. ‘माझे ध्यान लागले. नंतर ‘वृक्ष जोरजोरात हालत आहेत’, असे मला दिसले.

२. त्यानंतर माझे मन एकाग्र झाले. त्या वेळी मला ‘पांढरी वर्तुळे गोलाकार फिरून पुढे पुढे जात आहेत’, असे दिसले.’ (११.७.२०२१) (क्रमशः पुढच्या रविवारी)

– कु. तेजल पात्रीकर (संगीत िवशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (१२.१०.२०२१)