साधना समजल्यानंतर ‘सर्व देवाण-घेवाण हिशोब लवकर संपवून याच जन्मात मुक्त व्हायचे आहे’, असे ध्येय ठेवून व्यष्टी आणि समष्टी साधना तळमळीने करणार्‍या मंतरवाडी, पुणे येथील सौ. जयश्री शिंदे !

मंतरवाडी, पुणे येथील धर्मप्रेमी महिला सौ. जयश्री शिंदे जानेवारी २०२० पासून धर्मशिक्षणवर्गाच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याशी जोडल्या आहेत. साधना समजल्यानंतर त्यांनी लगेचच व्यष्टी आणि समष्टी साधनेला आरंभ केला. त्यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न, त्यांना आलेली अनुभूती आणि पुण्यातील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. जयश्री शिंदे

१. कु. क्रांती पेटकर

१ अ. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी धर्मप्रेमींची भेट घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन केल्यानंतर सौ. जयश्री शिंदे यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ होणे : ‘मार्च २०२० मधील दळणवळण बंदी लागू होण्यापूर्वी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी मंतरवाडी, पुणे येथील धर्मप्रेमींची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या साधनेविषयीच्या शंकांचे निरसन केले. त्यानंतर तेथील सौ. जयश्री शिंदे यांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न पुष्कळ वाढले.

१ आ. समष्टी साधनेची तळमळ असल्याने अनेक लोकांपर्यंत हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा विषय पोचावा, यासाठी सौ. जयश्री शिंदे यांनी घेतलेला पुढाकार ! 

१ आ १. सभेचा प्रसार करतांना महिलांच्या बैठका ठरवणे : सौ. जयश्रीताईंची समष्टी साधनेची तळमळ सतत दिसून येते. फेब्रुवारी २०२० मध्ये हडपसर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा होती. त्या सभेच्या प्रसारासाठी त्यांनी आपल्या गावात सभेचा प्रसार केला. त्यांनी पुढाकार घेऊन महिलांच्या अनेक बैठका ठरवल्या.

१ आ २. सौ. जयश्रीताई यांनी अभ्यास करून विविध सणांनिमित्त प्रवचने घेणे आणि स्वतःही सणातील प्रत्येक कृती शास्त्रानुसार अन् भावपूर्ण रितीने करण्याचा प्रयत्न करणे : सौ. जयश्रीताई सण-उत्सव यांमागील असलेल्या शास्त्राचा अभ्यास करून बोली भाषेत तो विषय मांडण्याचा प्रयत्न करतात. विषय मांडतांना झालेली चूक पुढच्या प्रवचनात सुधारण्यासाठी त्या तळमळीने प्रयत्न करतात. प्रवचनात सांगितल्यानुसार सणातील प्रत्येक कृती शास्त्रानुसार आणि भावपूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. साधनेत केवळ स्वतः पुढे न जाता अन्य धर्मप्रेमी महिलांनाही सर्व माहिती व्हावी आणि त्यांना लाभ व्हावा, यासाठी त्यांची धडपड असते.

१ आ ३. ‘ऑनलाईन’ प्रसारसेवेचे नियोजन करून अधिकाधिक लोकांनी सभेचा लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न करणे : ६.२.२०२१ या दिवशी ‘हिंदु जनजागृती समिती’ची ‘ऑनलाईन’ सभा होती. जयश्रीताईंनी या सभेच्या प्रसारसेवेचे नियोजन केले. संपर्कातील अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी सभा चालू होईपर्यंत त्यांनी सर्वांना पुन्हा भ्रमणभाष करून ऑनलाईन सभा पहाण्याची आठवण करून दिली. त्या दिवशी सायंकाळी सभेच्या वेळी पुष्कळ थंडी वाजत होती, तरी आजूबाजूच्या महिला आणि कुटुंबीय यांना एकत्र करून त्यांनी लोकांना पूर्ण सभा पहाण्यास प्रवृत्त केले.

१ इ. साधनेत येण्यापूर्वी सौ. जयश्रीताईंची स्थिती आणि साधनेनंतर जाणवलेले पालट

१ इ १. साधना करण्यापूर्वी निरुत्साही आणि नकारात्मक स्थिती असणे : साधनेत येण्यापूर्वी जयश्रीताईंच्या मनाची स्थिती निरुत्साही आणि नकारात्मक असायची. त्यामुळे घरातील नित्याची कामे करणेही त्यांना पुष्कळ कठीण व्हायचे. अनेकदा त्यांच्या मनात तीव्र निराशेचे विचार यायचे. घरातही त्यांची सतत चिडचिड होत असे.

१ इ २. साधनेला प्रारंभ केल्यावर जयश्रीताईंचा चिडचिडेपणा न्यून होऊन त्यांची स्थिरता वाढणे : साधनेला प्रारंभ केल्यावर त्यांना स्वतःमध्ये पुष्कळ पालट जाणवू लागले. दिवसभर त्यांना पुष्कळ उत्साही वाटून घरातील त्यांची कामेही सहजतेने होत आहेत. त्यांचा चिडचिडेपणा न्यून होऊन प्रत्येक प्रसंगात त्यांना स्थिर रहाता येते, तसेच प्रत्येक कृती भावपूर्ण रितीने होते.

१ इ ३. आध्यात्मिक उन्नतीची तळमळ वाढणे : जयश्रीताईंना सनातनच्या आश्रमात जाऊन काही दिवस आश्रमजीवन अनुभवण्याची पुष्कळ इच्छा आहे. त्या म्हणतात, ‘‘संसारात कितीही कष्ट केले, तरी ते अल्पच असणार आहेत. मला आता यात अडकायचे नाही. माझे सर्व देवाण-घेवाण हिशोब लवकर संपवून याच जन्मात मला मुक्त व्हायचे आहे.’’ त्या त्यांच्या यजमानांना सांगतात, ‘‘तुम्हीही आता व्यवहारात जास्त न अडकता साधनेचे प्रयत्न लवकर चालू करा.’’

१ ई. अनुभूती – पाण्याच्या टाकीवर बसवलेल्या विद्युत् ‘मोटर’च्या बटणात बिघाड झालेला असणे आणि जयश्रीताईंनी टाकीच्या आसपासच्या भागाची नियमित शुद्धी केल्याने बटणातील बिघाड आपोआप दूर होऊन ते चालू होणे : ‘सौ. जयश्रीताईंच्या घरासमोरील अंगणात पाण्याची एक टाकी आहे. डिसेंबर २०२० मध्ये टाकीवर बसवण्यात आलेल्या विद्युत् ‘मोटर’च्या बटणात बिघाड झाला होता. जयश्रीताई सकाळी त्या टाकीतील पाण्यात उदबत्तीची विभूती घालत आणि टाकीचा ‘स्विच बोर्ड’ असलेल्या आणि आजूबाजूच्या भागाची त्या नियमित शुद्धी करत. काही दिवसांनी ‘विद्युत् ‘मोटर’चे बिघडलेले बटण आपोआप व्यवस्थित चालू झाले’, अशी त्यांना अनुभूती आली.’

२. सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)

सौ. मनीषा पाठक

२ अ. साधकांची प्रेमभावाने विचारपूस करणार्‍या जयश्रीताई ! : ‘फेब्रुवारी २०२० मध्ये हडपसर येथे झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेच्या वेळी जयश्रीताईंकडे काही साधक गेले होते. त्या साधकांची जयश्रीताई अजूनही प्रेमाने विचारपूस करतात. ताई ज्या ज्या साधकांच्या संपर्कात आल्या आहेत, त्यांच्याशी त्या स्वतःहून संपर्कात रहातात.

२ आ. जयश्रीताईंमध्ये असलेली समष्टी सेवेची तळमळ ! : सौ. जयश्रीताईंच्या बोलण्यातून त्यांची समष्टी सेवेची तळमळ जाणवते. त्यांनी अल्प कालावधीत सभेचा प्रसार केला. त्या त्यांच्या नातेवाइकांना हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या उपक्रमांचे निमंत्रण देतात. ‘नवीन सेवा शिकून आणखी चांगले प्रयत्न करावेत’, अशी त्यांची धडपड असते.’

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक