कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना साहाय्य देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्याचा शासनाचा निर्णय !

मुंबई – कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून ५० सहस्र रुपये साहाय्य निधी देण्याचा आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. यावर कार्यवाही होण्याच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर तक्रार निवारण समितींची स्थापना करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी याविषयीची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.

महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या बाहेरील क्षेत्र अशा दोन समित्या नियुक्त करण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील. महानगरपालिका क्षेत्रात क्षेत्रनिहाय या समितीची स्थापना करण्यात येणार असून संबंधित क्षेत्राचे उपायुक्त या समितीचे अध्यक्ष असतील.