उत्साही, सेवेसाठी तत्पर आणि परात्पर गुरु डॉक्टरांवर नितांत श्रद्धा असणारे नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे !

उत्साही, इतरांना साहाय्य करण्यासाठी तत्पर असलेले आणि प्रतिकूल परिस्थितीतही तळमळीने साधना करणारे ‘महावितरण आस्थापना’तील उपकार्यकारी अभियंता ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे यांची त्यांच्या पत्नी सौ. ज्योती नागरे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. नीलेश नागरे

१. उत्साही आणि प्रसन्न

‘श्री. नीलेश (यजमान) नेहमी उत्साही आणि प्रसन्न असतात. त्यांच्या तोंडवळ्यावर कधीही थकवा जाणवत नाही.

२. यजमानांना नीटनेटकेपणाची आवड असणे आणि ‘वस्तूंतून सात्त्विक स्पंदने यावीत’, यासाठी त्यांनी प्रयत्न करणे

यजमान घरात, कार्यालयात आणि श्रीरामपूर येथे रहात असलेल्या त्यांच्या खोलीत ‘सर्व गोष्टी व्यवस्थित, स्वच्छ अन् नीटनेटक्या कशा रहातील ? त्यातून सात्त्विक स्पंदने कशी येतील ?’, असा प्रयत्न करतात. ‘कार्यालयातील त्यांच्या कक्षात प्रसन्न आणि सात्त्विक वाटते. त्यांच्या कक्षात गेल्यावर मंदिरात आल्यासारखे वाटते’, असे कार्यालयातील त्यांच्या सहकार्‍यांनी सांगितले.

३. यजमानांची सर्वांशी जवळीक असणे आणि त्यांनी इतरांच्या अडचणी तत्परतेने सोडवणे

आमचे नातेवाईक, यजमानांचे मित्र, ‘महावितरण’च्या कार्यालयातील सहकारी आणि ग्राहक यांना श्री. नीलेश हवेहवेसे वाटतात. कुणाला काही अडचण असली, तर ते श्री. नीलेश यांना प्रांजळपणे अडचणी सांगतात. श्री. नीलेश सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांची अडचण सोडवतात.

४. साधनेची तळमळ

४ अ. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्यापासून यजमानांना साधनेचे महत्त्व ठाऊक असणे आणि दळणवळण बंदीच्या काळात त्यांनी साधना अन् सेवा यांना वेळ देणे : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असल्यापासूनच श्री. नीलेश यांना अन्य गोष्टींपेक्षा ‘साधना करणे’ अत्यंत महत्त्वाचे वाटत होते. ते नेहमी म्हणतात, ‘‘साधना आणि गुरु हेच शाश्वत आहेत.’’ मध्यंतरी कार्यालयातील दायित्वामुळे यजमानांकडून साधनेचे प्रयत्न व्यवस्थित होत नव्हते. तेव्हा त्यांना त्याची खंत वाटत होती. कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदी लागू झाल्यावर त्यांनी उपलब्ध वेळेत साधना आणि सेवाही केली. त्यामुळे ‘त्यांच्यामध्ये मोठा पालट झाला आहे’, असे मला वाटते.

४ आ. प्रतिदिन पहाटे उठून यजमानांनी सेवा करणे : ते प्रतिदिन सकाळी सामूहिक ‘ऑनलाईन’ नामजपासाठी जोडणी करण्याची आणि त्या संदर्भातील समन्वयाची सेवा करतात. त्यांना रात्री झोपायला कितीही उशीर झाला आणि काही वेळा प्रकृती ठीक नसली, तरी ते पहाटे ४.३० वाजता उठून सेवा करतात.

४ इ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे यजमानांना वाटणारे महत्त्व : यजमानांना स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया आवडते. ते नेहमी म्हणतात, ‘‘ही प्रक्रिया राबवल्यामुळे व्यक्तीमत्त्वाचा विकास होतो. आपण नेहमी सकारात्मक रहातो आणि आपल्याला आयुष्यात कायमस्वरूपी आनंद मिळतो.’’

४ ई. नोकरी व्यतिरिक्त मिळणारा वेळ व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी वापरणे : यजमानांच्या काही सहकार्‍यांनी त्यांना विविध संघटनांची मुख्य पदे भूषवण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी ‘कॉन्ट्रॅक्टरशीप’ (ठेकेदारी) चालू करण्याविषयी सुचवले होते. त्या वेळी यजमान म्हणाले, ‘‘महावितरण’कडून मिळत असलेले वेतन मला पुरेसे आहे. मी नोकरीच्या व्यतिरिक्त उरलेला वेळ धर्मकार्यासाठीच देईन !’’ कार्यालयीन कामाव्यतिरिक्त ते नेहमी व्यष्टी आणि समष्टी साधनेत मग्न असतात. ‘कार्यालयात आणि सभोवतीचे वातावरण रज-तमात्मक असतांनाही केवळ गुरुकृपेने साधनेत टिकून आहोत’, याबद्दल त्यांच्या मनात नेहमी कृतज्ञताभाव असतो.

५. यजमानांच्या मनात सनातन संस्थेच्या साधकांप्रती असलेले प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा !

सौ. ज्योती नागरे

यजमानांच्या मनात सनातन संस्थेच्या साधकांप्रती प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा आहे. साधकांचा भ्रमणभाष आल्यावर त्यांना पुष्कळ आनंद होतो. ते त्यांना तत्परतेने साहाय्य करतात. ते नेहमी म्हणतात, ‘‘सनातनचे साधक हे ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे साधक’ आहेत. गुरुदेवांना साधक अतिशय प्रिय आहेत. समाजातील लोक साधना करत नाहीत, तरी आपण त्यांच्यावर प्रेम करतो. आपले साधक गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे साधना करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता त्यांच्यावर गुरुदेवांप्रमाणेच प्रेम करावे.’’

६. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती श्रद्धा

६ अ. गुरुकृपेमुळे जीवनदान मिळाल्याने कृतज्ञता वाटणे : फेब्रुवारी २०१९ मध्ये यजमानांच्या वाहनाला मोठा अपघात झाला होता. ‘त्या वेळी मी केवळ गुरुकृपेमुळेच वाचलो’, असे ते नेहमी सांगतात. अपघातानंतर त्यांनी अल्प कालावधीत स्वतःला सावरले.

६ आ. इतरांनी केलेल्या चुकीमुळे एका कार्यालयीन कारवाईला सामोरे जावे लागल्यावर ‘स्वतःच्या बाबतीत असे का झाले ?’, असा विचार यजमानांच्या मनात येणे : इतरांनी केलेल्या चुकीमुळे श्री. नीलेश यांना एक ‘प्रमुख अधिकारी’ या नात्याने एका कार्यालयीन कारवाईला सामोरे जावे लागले. त्या वेळी त्यांची कोणतीही चूक नव्हती, तरी त्यांनी सर्व परिस्थिती स्वीकारली. त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर नितांत श्रद्धा आहे. ‘भगवंत कधीच कुणावर अन्याय करत नाही’, याची त्यांना जाणीव आहे, तरी ‘मी चांगले वागतो आणि साधना करतो, तरी माझ्या बाबतीत असे का झाले ?’, असा विचार त्यांच्या मनात यायचा.

६ आ १. ‘सनातन प्रभात’मध्ये यजमानांची अनुभूती प्रसिद्ध होऊन परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचे अभिनंदन केल्याचे वाचल्यावर ‘गुरुदेव समवेत आहेत’, असे वाटून यजमानांची श्रद्धा दृढ होणे : त्याच कालावधीत दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये श्री. नीलेश यांची अनुभूती प्रकाशित झाली होती. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचे अभिनंदन केले होते. ते वाचून त्यांची गुरुदेवांप्रतीची श्रद्धा अधिक दृढ झाली. ते म्हणाले, ‘‘सारे जग जरी माझ्या विरोधात गेले, तरी माझे गुरु माझ्या समवेत आहेत. आपले प्रारब्ध न्यून करण्यासाठी देव असे प्रसंग घडवत आहे.’’ त्या कालावधीतही यजमान आनंदी आणि उत्साही होते.

– सौ. ज्योती नागरे (श्री. नीलेश नागरे यांच्या पत्नी), नाशिक (१५.८.२०२१)


‘महावितरण’च्या कार्यालयातील सहकार्‍यांना श्री. नीलेश नागरे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

श्री. सुमित सिन्नरकर (श्री. नागरे यांच्या खोलीतील सहकारी), श्रीरामपूर (जि. नगर)

१. सतत सेवारत असणे

‘मी २ वर्षांपासून श्री. नागरेसाहेबांच्या समवेत त्यांच्या खोलीत रहात आहे. नागरेसाहेब सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षणी काही ना काही कृती करत असतात. ते कधीही वेळ वाया घालवत नाहीत.

२. आम्ही नागरेसाहेबांकडून नेहमी शिकत असतो. आमचे वरिष्ठ अधिकारीही त्यांची नेहमी प्रशंसा करतात.’

श्री. सुजय उपाध्ये आणि श्री. अक्षय विखे (कार्यालयातील सहकारी अभियंते) अन् श्री. सुमित सिन्नरकर

१. कार्यालयीन काम ‘साधना’ म्हणून पूर्ण करत असल्याने श्री. नीलेश नागरे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांचा विश्वास संपादन केलेला असणे

‘श्री. नागरेसाहेब यांच्याकडे एका विभागाचे दायित्व आहे. असे असतांनाही त्यांचे वरिष्ठ त्यांना अन्य विभागाचेही दायित्व देतात. याचे कारण वरिष्ठांना विश्वास असतो की, नागरेसाहेबांना एखादे दायित्व दिले, तर ते १०० टक्के पूर्ण करणारच ! नागरेसाहेबांना एखादे काम सांगितल्यावर ‘ते कार्य साधनेच्या दृष्टीकोनातून कसे करायला हवे ? या माध्यमातून गुरुदेव आणि ईश्वर यांची सेवा कशी करायला हवी ?’, हा विचार करून ते नियोजनबद्धरित्या कार्य पूर्ण करतात. त्यामुळे त्यांना नेहमी पारितोषिके मिळतात.

२. श्री. नीलेश नागरे यांनी सहकार्‍यांना प्रत्यक्ष कामकाजाच्या ठिकाणी जाऊन साहाय्य करणे

महावितरणच्या प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी (‘फिल्ड’वरील) काही अडचणी आल्यास नागरेसाहेब सहकार्‍यांना केवळ तोंडी मार्गदर्शन न करता ‘साईट’वर जाऊन अडचणी सोडवायला साहाय्य करतात. ते प्रसंगी कर्मचार्‍यांशी वाद घालणार्‍या ग्राहकांशी स्वतः बोलून, त्यांचे मतपरिवर्तन करून, त्यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळवतात.

३. कर्मचार्‍यांना योग्य मार्गदर्शन करून आधार देणे

श्री. नागरे महावितरण कार्यालयातील कर्मचार्‍यांना योग्य मार्गदर्शन करून ‘कुठलीही चूक होऊ नये’, याची दक्षता घेतात. कर्मचार्‍यांकडून काही चूक झाल्यास ते ती दुरुस्त करण्याचा योग्य मार्ग दाखवतात. ते कर्मचार्‍यांच्या कार्यालयीन किंवा घरगुती अडचणी यासंबंधी प्रेमाने मार्गदर्शन करतात.

४. एकदा कार्यालयात मंत्री महोदयांनी अकस्मात् चहाची मागणी केल्यावर त्यांना लगेच चहा उपलब्ध करून देणार्‍या श्री. नागरे यांची तत्परता !

नागरेसाहेबांना कोणतेही काम करण्यात न्यूनता वाटत नाही. एकदा कार्यालयात एक वरिष्ठ मंत्री आढावा बैठकीसाठी आले असतांना मा. मंत्री महोदयांनी (त्यांना चहाची सवय नसतांनाही) अकस्मात् चहा मागितला. तेव्हा ‘दळणवळण बंदी असल्याने सगळी उपाहारगृहे बंद असतांना चहा कुठून आणायचा ?’, असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा नागरेसाहेबांनी त्यांच्या कपाटातून ‘ग्रीन-टी’चे पाकीट उघडले आणि मंत्री महोदयांना चहा करून दिला.

५. गुरुकार्याची तळमळ

गुरुपौर्णिमेला श्री. नागरे यांना अकस्मात् प्रवचनासाठी बोलावल्यावर त्यांनी ‘गुरु-शिष्य परंपरा’ या विषयावर प्रवचन केले. यातून त्यांची गुरुकार्याची तळमळ लक्षात आली. (ऑगस्ट २०२१)