‘जागतिक भूक निर्देशांका’त भारत १०१ व्या स्थानी

पाकिस्तान, नेपाळ अन् बांगलादेश यांच्याही मागे भारत !

नवी देहली – भारत ‘जागतिक भूक निर्देशांक (ग्लोबल हंगर इंडेक्स) २०२१’ मध्ये ११६  देशांपैकी १०१ व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी भारत ९४ व्या क्रमांकावर होता, म्हणजे एका वर्षांत तो ७ स्थानांनी घसरला आहे. आता तो पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ यांच्याही मागे आहे. आयर्लंडची यंत्रणा ‘कन्सर्न वर्ल्डवाईड’ आणि जर्मनीची संस्था ‘वेल्ट हंगर हिल्फे’ यांनी प्रकाशित केलेल्या संयुक्त अहवालात भारतातील भुकेची पातळी ‘चिंताजनक’ असल्याचा उल्लेख केला आहे.

१. नेपाळ ७६, म्यानमार ७१ आणि पाकिस्तानने ९२ वे स्थान मिळवले आहे. या देशांमध्ये उपासमारीची परिस्थिती चिंताजनक असली, तरी भारताशी तुलना केल्यास हे सर्व देश भारताच्या पुढे आहेत. नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तान यांसारख्या देशांनी त्यांच्या नागरिकांना अन्न पुरवण्यामध्ये भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

२. वर्ष २००० मध्ये भारताचा जागतिक भूक निर्देशांक ३८.८ होता, तर २०१२ ते २०२१ या कालावधीत तो २८.८ ते २७.५ यामध्ये होता. जागतिक भूक निर्देशांकाची गणना करण्यासाठी ४ गोष्टींचे निरीक्षण केले जाते, ज्यामध्ये कुपोषण, मुलांच्या वाढीचा दर, अल्पपोषण आणि बालमृत्यूशी संबंधित आकडे घेतले जातात. या अहवालात, चीन, ब्राझिल आणि कुवैत यांच्यासह १८ देशांनी ५ पेक्षा अल्प जागतिक भूक निर्देशांक मिळवत अव्वल स्थान पटकवले आहे.