मंदिरांची आरास करण्यासाठी नोटांचा वापर करणे अत्यंत अयोग्य आहे. हिंदूंना धर्मशिक्षण आणि सामाजिक भान नसल्याने ते सवंग लोकप्रियतेसाठी अशा काहीतरी कृती करत असतात ! – संपादक
महबूबनगर (तेलंगाणा) – नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने येथील कन्यका परमेश्वरी देवीच्या मंदिराची कोट्यवधी रुपयांच्या नोटांद्वारे आरास करण्यात आली आहे. यासाठी एकूण ४ कोटी ४४ लाख ४४ सहस्र ४४४ रुपयांच्या खर्या नोटांचा वापर करण्यात आला आहे. भाविकांकडून देणगी स्वरूपात मिळालेल्या नोटांचाच वापर यासाठी करण्यात आला आहे. मंदिरातील मूर्ती आणि भिंती यांना नोटा चिकटवून हे मंदिर सजवण्यात आले आहे.
नेल्लूर (आंध्रप्रदेश) येथेही नोटांद्वारे सजावट
आंध्रप्रदेशमधील नेल्लूर जिल्ह्यातील स्टोन हाऊस पेटा भागातही कन्यका परमेश्वरी देवीचे मंदिर आहे. या मंदिरातही अशा प्रकारे खर्या नोटांनी सजवण्यात आले आहे. तसेच सजावटीसाठी सोन्या-चांदीचाही वापर करण्यात आला आहे. नोटांपासून फुले आणि हार बनवण्यात आले आहेत. यासाठी भाविकांनी दान केलेल्या ५ कोटी १६ लाख रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.