विविध भावप्रयोग करून भावस्थितीत रहाणार्‍या आणि गुरुकार्याची तळमळ असलेल्या सौ. पिंकी माहेश्वरी (वय ४२ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

जळगाव – ब्रह्मपूर (बुरहानपूर) मध्यप्रदेश येथील सौ. पिंकी माहेश्वरी (वय ४२ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, ही आनंददायी वार्ता सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी २ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या एका ‘ऑनलाईन’ सत्संगात उपस्थितांना दिली. ही वार्ता ऐकल्यावर अनेक साधकांची भावजागृती झाली. या वेळी सनातनच्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. रंजना अंबालाल दाणेज यांनी सौ. माहेश्वरी यांना श्रीकृष्णाचे छायाचित्र भेट दिले, सौ. माहेश्वरी यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकांनी त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्येही या वेळी सांगितली.

डावीकडून सौ. पिंकी माहेश्वरी यांना श्रीकृष्णाचे छायाचित्र भेट देतांना सौ. रंजना दाणेज

सौ. पिंकी माहेश्वरी यांच्याविषयी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

सौ. पिंकी माहेश्वरी

सौ. पिंकी माहेश्वरी मागील १० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करत आहेत. त्यांच्यासमवेत सेवा करतांना जळगाव आणि ब्रह्मपूर येथील सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. विमल कदवाने (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), ब्रह्मपूर

सौ. विमल कदवाने

१. सेवेची तळमळ

१ अ. न्यायालयात नोकरीसाठी जात-येत असतांना सौ. पिंकी माहेश्वरी यांनी सेवा करणे : ‘सौ. पिंकी ब्रह्मपूर (बुरहानपूर) येथील न्यायालयात लिपिक (क्लार्क) म्हणून नोकरी करतात. नोकरीमुळे त्यांना सेवेसाठी अल्प वेळ मिळतो. त्यामुळे त्या नोकरीला जातांना जाण्या-येण्याच्या मार्गावर असलेल्या साधकांच्या घरी त्यांना लागणारे प्रसारसाहित्य पोचवणे, त्यांच्याकडून साहित्य आणणे, अशा पद्धतीने सेवा करतात.

१ आ. न्यायालयातील सहकार्‍यांना सौ. माहेश्वरी यांनी सनातनच्या कार्याशी जोडून ठेवणे : सौ. पिंकी यांनी न्यायालयातील त्यांच्या सहकार्‍यांना विविध माध्यमांतून सनातनच्या कार्याशी जोडून ठेवले आहे. त्यांचे काही सहकारी ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार आहेत. त्यांच्या समवेत काम करणारे सहकारी आणि अधिवक्ते सनातनची सात्त्विक उत्पादने वापरतात. त्यातील काही जण सनातनचे ‘ऑनलाईन’ सत्संगही ऐकतात.

१ इ. सेवेतील बारकावे समजून घेऊन ती मनापासून आणि तळमळीने करणे : पूर्वी सौ. पिंकी यांचा सेवेतील बारकावे समजून त्याप्रमाणे सेवा करण्याचा भाग न्यून असायचा. आता त्या सेवेतील बारकावे समजून घेतात आणि ती मनापासून, भावपूर्ण अन् परिपूर्ण रितीने करण्याचा प्रयत्न करतात. कोणतीही सेवा सांगितल्यास त्या ती तत्परतेने स्वीकारतात आणि तळमळीने करतात. त्या स्वत:च्या क्षमतेपेक्षा अधिक सेवा करण्याचा प्रयत्न करतात.

२. सकारात्मकता

त्या इतरांना सेवेत साहाय्य करण्यास नेहमी सिद्ध असतात. त्या सर्व साधकांशी जवळीक साधतात. त्या नेहमी सकारात्मक असतात आणि इतरांनाही सकारात्मक दृष्टीकोन देतात.

३. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने राबवतात

त्या स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया गांभीर्याने करतात.

अ. त्यांचा स्वीकारण्याचा भाग आता वाढला असून इतरांच्या स्वभावदोषांत न अडकता त्या स्वतःच्या स्वभावदोषांचे अधिक निरीक्षण करतात.

आ. पूर्वी त्यांच्या नातेवाइकांकडून अधिक अपेक्षा असायच्या; परंतु आता अपेक्षांचे प्रमाण न्यून झाले आहे.

इ. त्यांच्याकडून एखादी चूक झाल्यास ती चूक त्या स्वभावदोष निर्मूलन सत्संगात प्रामाणिकपणे मांडतात आणि चूक झाल्याविषयी क्षमाही मागतात.

ई. स्वतःमध्ये गुणवृद्धी करण्याचे त्यांचे प्रयत्न वाढले आहेत. त्या भावजागृतीसाठी छोटे छोटे भावप्रयोग करून ते लिहून ठेवतात.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव

सौ. पिंकी यांच्या मनात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांच्या प्रती पुष्कळ भाव आहे. त्या सतत परात्पर गुरुदेवांच्या स्मरणात असतात. प्रत्येक प्रसंगात ‘परात्पर गुरुदेव सर्व सांभाळून घेतील’, असा त्यांचा विश्वास असतो.’ परात्पर गुरुदेवांच्या चरणांच्या प्राप्तीविना अन्य काहीच नको’, असे त्यांना वाटते.

श्री. दत्तात्रेय वाघुळदे, जळगाव (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के)

श्री. दत्तात्रेय वाघुळदे

१. गुरुकार्याची तळमळ

‘सौ. पिंकी माहेश्वरी यांच्या मनात ‘आपण गुरुकार्यात न्यून पडायला नको’, असा विचार सतत असतो.

अ. त्या न्यायालयातील त्यांच्या सहकार्‍यांना साधनेविषयी माहिती सांगतात आणि वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घेतात. त्यांच्या एक सहकारी आणि त्यांची १३ वर्षांची मुलगी दोघीही साधना करून सेवाही करायला लागल्या आहेत.

आ. माहेरी गेल्यावरसुद्धा त्यांना सेवेचाच ध्यास असतो. तेथील दोन मंदिरांत त्यांनी सामूहिक नामजप चालू केला.

२. विविध भावप्रयोग करून भावावस्थेत रहाण्याचा प्रयत्न करणार्‍या सौ. पिंकी माहेश्वरी !

त्या अतिशय भावपूर्ण रितीने भावार्चना सांगतात. त्या भावार्चना सांगत असतांना साधकांची भावजागृती होते. ताई प्रत्येक कृतीला भाव जोडून ती कृती भावपूर्ण रितीने करतात, उदा. न्यायालयात काम करतांना त्या ‘मी रामनाथी आश्रमातच बसून सेवा करत आहे’, असा भाव ठेवतात. त्यांना भावाच्या स्तरावर वेगवेगळे प्रयोग सुचतात.

सौ. समता बोहरा, ब्रह्मपूर

इतरांना साहाय्य करण्याचा आणि समजून घेण्याचा भाग वाढणे : ‘सौ. पिंकीताईंमधील स्वभावदोष आता न्यून झाले आहेत. त्यांचा इतरांना साहाय्य करण्याचा आणि समजून घेण्याचा भाग वाढला आहे. ताईंच्या बोलण्यातून प्रेमभाव जाणवतो. त्यांच्या व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्येही वाढ झाली आहे.’

सौ. रंजना दाणेज (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), ब्रह्मपूर

साधनेची तळमळ वाढणे : ‘सौ. पिंकीताईंचे स्वतःतील स्वभावदोष दूर करण्याचे प्रयत्न वाढले आहेत. त्यांची साधनेची तळमळही वाढली आहे.’

सौ. सुनीता पाटील, ब्रह्मपूर

सेवा तळमळीने अन् तत्परतेने पूर्ण करणे : ‘सौ. पिंकीताई प्रत्येक सेवा मनापासून स्वीकारतात आणि ती सेवा तळमळीने अन् तत्परतेने पूर्ण करतात. ताईंमधील ‘प्रेमभाव’ आणि ‘शिकण्याची वृत्ती’ हे गुण वाढले असून त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्नही वाढले आहेत.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक ५.९.२०२१)