रेल्वेला प्रतिवर्षी प्रवाशांनी थुंकून घाण केलेले डबे आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी येतो १ सहस्र २०० कोटी रुपयांचा खर्च !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा हा परिणाम आहे ! हे भारतियांना लज्जास्पदच होय ! – संपादक

प्रतिनिधिक छायाचित्र

नवी देहली – प्रतिवर्षी भारतीय रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या थुंकण्याच्या सवयीमुळे पडलेले डागांची, तसेच अन्य नियमित स्वच्छता करण्यासाठी लाखो लीटर पाणी वापरावे लागते. एकूणच स्वच्छतेसाठी प्रतिवर्ष  १ सहस्र २०० कोटी रुपये इतका खर्च करावा लागतो. विशेष म्हणजे पान मसाला आणि तंबाखू खाऊन थुंकणार्‍या व्यक्तींनी रेल्वेचे डब्बे, रेल्वेच्या मालकीची जागा आणि संपत्ती यांवर थुंकून केलेली घाण स्वच्छ करण्यासाठी हा खर्च येत आहे.

रेल्वे परिसरात थुंकण्यासाठी प्रशासनाकडून प्रवाशांना ‘स्पिटॉन’चा वापर करण्याचा सल्ला !

(‘स्पिटॉन’ म्हणजे थुंकण्यासाठी कापसापासून बनवलेला विशिष्ट प्रकारचा गोळा !)

प्रवासी बेशिस्त असतील, तर ते ‘स्पिटॉन’चा वापर करतील का ? थुंकण्याची सुविधा उपलब्ध करण्यासह कुठेही थंकणार्‍यांकडून कठोर आर्थिक दंड वसूल केल्यास हे प्रकार थांबतील ! – संपादक

‘स्पिटॉन’ पाऊच विक्रीसाठी व्हेंडींग मशीन

थुंकण्याच्या माध्यमांतून होणारी अस्वच्छता, तसेच संसर्ग यांचा प्रतिबंध करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना ‘स्पिटॉन’ला प्रधान्य देण्याचा सल्ला दिला जात आहे. ‘स्पिटॉन’चा मूळ अर्थ थुंकण्यासाठीचे भांडे; मात्र रेल्वे प्रशासनाने निर्माण केलेले ‘स्पिटॉन’ हे थुंकण्यासाठी कापसापासून बनवलेला विशिष्ट प्रकारचा गोळा होय. या गोळ्यांमध्ये झाडाची बीही असते. वापर करून झाल्यानंतर हे गोळे फेकून देता येतात. रेल्वेने ४२ स्थानकांवर ‘स्पिटॉन’ पाऊच विक्रीसाठी व्हेंडींग मशीन्स (पैसे टाकल्यानंतर संबंधित वस्तू बाहेर येणारे यंत्र) लावण्याची अनुमती दिली आहे. हे स्पिटॉन ५ ते १० रुपयांना उपलब्ध होणार आहेत. या पाऊचचा वापर १५ ते २० वेळा करता येऊ शकेल. संपूर्ण वापर झाल्यावर पाऊच मातीत टाकता येईल. हे पाऊच मातीत पूर्णपणे मिसळतात. त्यामुळे प्रदूषणाची समस्या उद्भवणार नाही. ‘स्पिटॉन’ बनवण्यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या माध्यमातून थुंकीमध्ये असणारे विषाणू या स्पिटॉनमध्ये अडकून रहातात आणि या स्पिटॉनच्या माध्यमातून संसर्ग टाळला जातो.