‘स्त्री’ सन्मान !

नोंद 

आज सामाजिक माध्यमांचा वापर सर्रास होत असल्यामुळे जग पुष्कळ जवळ आले आहे. या सामाजिक माध्यमांचा वापर आपण चांगल्या उद्देशाने केला; म्हणून समोरची व्यक्तीही त्याच हेतूने त्याकडे पाहील, अशी स्थिती मात्र राहिलेली नाही, हे दुर्दैवी आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेमधून याची जाणीव तीव्रतेने होते. एका महिलेची छायाचित्रे आणि व्हिडिओ यांचा अपवापर करून तिला ‘ब्लॅकमेल’ करण्यात आले. अशा प्रकारच्या घटना अधून मधून ऐकायला मिळतात, हेही सत्य आहे.

सामाजिक माध्यमांमधून ज्या युवतींची छायाचित्रे किंवा ‘व्हिडिओ’ यांचा अपवापर केला जातो, त्या वेळी त्या युवती किंवा महिला ‘याला काही प्रमाणात उत्तरदायी असणार’, असा विचार सर्वसामान्यांच्या मनाला सहज स्पर्शून जातो. हे सत्य मानले, तरी अशा प्रकारे दुष्कृत्य करणारे गुन्हेगार आणि नैतिकतेअभावी पसरलेली ही विकृती आहे, याकडेही लक्ष वेधले गेले पाहिजे. या विकृतीने ‘मनाची नाही, तर जनाचीही लाज’ सोडली आहे. याला आळा घालण्यास यंत्रणाही अल्प पडत आहेत, तसेच या घटनांमध्ये अशा प्रकारची छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रसारित करण्याचे दुष्कृत्य अधिकतर परिचित व्यक्तींकडून केले जात आहे, जे अतिशय वेदनादायी आणि भयंकर आहे. त्यामुळे आपण आपली वैयक्तिक छायाचित्रे किंवा व्हिडिओ ज्यांना पाठवणार, ती व्यक्तीही तेवढी विश्वासार्ह आहे का ? हे पहाणे महत्त्वाचे आहे. यासाठी घटना घडून गेल्यानंतर पश्चात्ताप करत बसण्यापेक्षा आधीच काळजी घेणे केव्हाही योग्यच ! त्यामुळे आपण स्वतःची छायाचित्रे किंवा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमधून प्रसारित करणे टाळायला हवे, हेच शिकायला हवे. हा विचार स्वीकारण्यास कठीण वाटला, तरी महिलांनीच स्वसन्मानासाठी असा विचार करायला हवा.

हिंदु धर्मात ‘स्त्री’ ला अत्यंत सन्मानाचे स्थान आहे. परस्त्री मातेसमान आणि भगिनीसमान मानली गेली आहे. असे विचार समाजामध्ये रुजण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे, नैतिकतेचे धडे देणे, तसेच दुष्कृत्य करणार्‍यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे. संस्कारांची शिदोरी आणि नैतिकतेचे विचार अशा घटना रोखण्यासाठी नक्कीच साहाय्य करतील. नवरात्रीनिमित्त चालू असलेल्या आदिशक्तीचा जागर करत तिलाच प्रार्थना करूया, ‘हे आदिशक्ती, तूच ही विकृती नष्ट करण्यासाठी आणि प्रत्येक ‘स्त्री’चा सन्मान करण्यासाठी बळ दे.’

– सौ. स्नेहा ताम्हनकर, रत्नागिरी