मुंबई महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा
मुंबई – मुंबईत झालेले लसीकरण आणि सध्याची कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी यांचा दाखला देत महापालिकेने मुंबई सुरक्षित असल्याचे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे. त्या आधारावर मुंबईला कोरोनाच्या तिसर्या लाटेचा धोका नसल्याचा दावा मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात केला आहे.
१. मुंबईत ४२ लाख नागरिकांना कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, तर ८२ लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
२. अंथरुणाला खिळलेल्या, अपंग, तसेच आजारी नागरिकांचे घरी जाऊन लसीकरण करण्याची मागणी करणार्या याचिकेवर खंडपिठासमोर ४ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयात मुंबई महापालिकेने ही माहिती दिली.
३. महापालिकेच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले की, अंथरुणाला खिळलेल्या २ सहस्र ५८६ नागरिकांना दोन्ही लसमात्रा, तर ३ सहस्र ९४२ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. बनावट लसीकरणाच्या १० पैकी ९ गुन्ह्यांचे अन्वेषण मुंबई पोलिसांनी पूर्ण करून आरोपपत्रही प्रविष्ट केल्याची माहितीही मुंबई महापालिकेने दिली. त्यावर ‘कुणीही लसीकरणापासून वंचित रहाणार नाही’, असे नमूद करत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.