१० ऑक्टोबरला मडगाव रेल्वेस्थानकानजीक ‘मेगाब्लॉक’ असल्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील ८ गाड्या रहित

प्रतिकात्मक छायाचित्र

सिंधुदुर्ग – दक्षिण-पश्चिम रेल्वे मडगाव रेल्वेस्थानकानजीक रेल्वेरुळांचे काम करण्यासाठी १० ऑक्टोबरला ‘मेगाब्लॉक’ (रेल्वेमार्गाच्या अनुषंगाने काम करण्यासाठी मोठ्या कालावधीसाठी या मार्गावरील वाहतूक बंद करणे) घेणार आहे. या ‘मेगाब्लॉक’मुळे १० ऑक्टोबर या दिवशी कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्‍या ८ गाड्या रहित करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावर मडगाव स्थानकानजीक सावर्डे-चांदोर-मडगाव जंक्शन हा मार्ग दुपदरीकरणाने जोडला जाणार आहे. या कामासाठी १० ऑक्टोबरला ‘मेगाब्लॉक’ घेण्यात येणार आहे. यासाठी तिरुपती-हैद्राबाद-तिरुपती ही ‘वास्को द गामा’ एक्सप्रेस, पुणे-एर्नाकुलम्-पुणे, रत्नागिरी-मडगाव-रत्नागिरी, मंगळुरू-मडगाव-मंगळुरू या ८ गाड्या रहित करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेमार्गावरून प्रत्येक बुधवारी धावणार्‍या ‘हिस्सार-कोईंबतूर’ या साप्ताहिक विशेष गाडीला एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार अहे. १३ ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत ही गाडी १९ डब्यांची असणार आहे.