देवा, कशास दिलीस
तू अमुच्या अधरी बासरी ।
तुझ्या कृपेचे धर्मस्वर
हे का निघती रे श्रीहरि ।। १ ।।
देव, तसा तू सखा ही माझा
आणि थोर हे ना गुज ।
पुरातन हा योग, जरी हा
स्वर सांगतो अलगूज ।। २ ।।
म्हणूनी स्वधर्म सेवा सांगतो हा सुस्वर पावा ।
इह-परलोकी धर्म एकला करतो शांतीचा धावा ।। ३ ।।
पहा स्वर हा भले स्वधर्मी मरण, जिणे परधर्मी भयकारी ।
धर्मतत्त्व हे नित्य जाणूनी स्व-कर्म तेच तू स्वीकारी ।। ४ ।।
परि जे कुणी दोष काढूनी न च अनुष्ठीती मत हे ।
हीन विवेकी ज्ञानशून्य ते नाश पावती पाहे ।। ५ ।।
सप्तस्वरांच्या बासुरीतूनी पहा देवा तुझेच ना हे स्वर ।
सांग ना रे का पुन्हा पुन्हा बोलती हे अधर ।। ६ ।।
ज्या ज्या काळी इथे भूतली होते धर्मग्लानी ।
अधर्म वाढला तदा अवतरलास ना तू सगुण रूप घेऊनी ।। ७ ।।
साधू जनाते संरक्षाया, दुर्जना दूर कराया ।
जन्मलास तू देवा, या कलियुगी सनातन धर्म स्थापाया ।। ८ ।।
पाप नाशूनी जगा दाखवशील धर्म आणि नीती ।
अनेक संत निर्मूनी गुढी उभारशील जगती ।। ९ ।।
जगत् उद्धरणासाठी साधकांकरवी डंका तू झडवी ।
विवेकदीप उजळूनी मार्ग मुक्तीचा सोपा करवी ।। १० ।।
दुष्ट-पातकी दूर करशील घातकी जे अधर्मी उद्युक्त ।
करशील सु-धीरा ही वसुंधरा भारापासूनी मुक्त ।। ११ ।।
सांग ना देवा, पुन्हा पुन्हा हेच स्वर बोलते मुरली ।
परात्पर गुरुदेवा, तुमच्याविना
आता या जगता नाही वाली ।। १२ ।।
जगा कसे कळावे चतुर रूप तुझे हे मोहिनी ।
कळले केवळ त्यांनाच जे झाले तुजसमवेत ज्ञानी ।। १३ ।।
झालो आम्ही तुझेच हृदय, तुझेच नेत्र, तुझी रसना ।
चरण तुझे, कर (हस्त) तुझे, तुझे रे चित्त मना ।। १४ ।।
द्वैत सरले, अद्वैत झाले, मी-तूपण गेले आता ।
धरा लोपली, आकाश लोपले आता, जाता जाता ।। १५ ।।
बोलाया आता शब्द न उरले सुस्वर थांबले ।
मूक झाला तुझा पावा आता अधर विसावले ।। १६ ।।
मंदिरात या पहा कसा घुमला पावा ।
देवा, काय मागू, मिळाला मज तुझ्या चरणी ठावा ।। १७ ।।
– पुष्पांजली, बेळगाव (१०.९.२०१८)