कोरोना नियमांचे पालन करून सण साजरे करून आनंद घ्या ! – ‘एम्स’ रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचे आवाहन

‘एम्स’ रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया

नवी देहली – सध्याच्या सणांच्या वेळी माझा प्रत्येकाला एवढाच सल्ला असेल की, आपण सण साजरा करा; पण हा संसर्ग पसरू नये, अशा प्रकारे साजरा करा. कोरोनाचे नियम पाळून वागा. आपण सण साजरा केला; पण त्यामुळे आपल्याच परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढले आणि त्यांना रुग्णालयांत भरती व्हावे लागले, अतीदक्षता विभागात भरती व्हावे लागले, हेही योग्य ठरणार नाही. हा तर सणांचा नवा नकारात्मक परिणाम होईल. यामुळे सण साजरे करा; पण त्याचसमवेत कोरोना नियमांचे पालन करा, असे आवाहन देहलीतील ‘एम्स’ रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डॉ. गुलेरिया यांचा या संदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात त्यांनी जनतेला सणांच्या काळात अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

डॉ. गुलेरिया यांनी पुढे म्हटले आहे की, हे समजले पाहिजे की, विषाणू अजूनही अस्तित्वात आहे. आपल्या सणांना प्रारंभ होत आहे. अनेक सण असे आहेत, जे आपल्याला कुटुंबियांसमवेत आणि मित्रांसमवेत साजरे करण्याची इच्छा असते. दसरा, दुर्गा पूजा, दिवाळी किंवा छठ पूजा, असे अनेक सण आता जवळ येत आहेत; पण हे सण जसे जवळ येत आहेत, तसे आपणही सावध रहाण्याची आवश्यकता आहे; कारण आपण हे समजून घेतले पाहिजे की, कोरोना विषाणू अजूनही अस्तित्वात आहे आणि हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीमध्ये अधिकाधिक पसरण्याची संधी शोधत आहे.