माझा मुलगा हिंसाचाराच्या वेळी घटनास्थळी असल्याचा पुरावा मिळाला, तर मी मंत्रीपदाचे त्यागपत्र देईन ! – केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे आव्हान

लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराचे प्रकरण

डावीकडे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा

लखीमपूर खीरी (उत्तरप्रदेश) – येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी भाजपचे स्थानिक खासदार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशीष यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याविषयी अजय मिश्रा यांनी, ‘जर माझा मुलगा आशीष हा हिंसाचाराच्या दिवशी घटनास्थळी असल्याचे सिद्ध करणारे कोणतेही पुरावे मिळाले, तर मी माझ्या मंत्रीपदाचे त्यागपत्र देईन’, असे आव्हान दिले आहे. शेतकरी नेत्यांनी आशीष यांच्या अटकेची मागणी केली आहे. या हिंसाचाराच्या प्रकरणी शेतकर्‍यांविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिश्रा यांच्या मालकीच्या एका चारचाकी गाडीसह ३ अन्य वाहनांच्या ताफ्याने शेतकर्‍यांना धडक दिली. यात ३ शेतकरी ठार झाले. त्यानंतर हिंसाचार चालू झाला. या ३ गाड्यांपैकी १ गाडी आशिष मिश्रा चालवत असल्याचा दावा शेतकर्‍यांनी केला आहे.

मी घटनास्थळी असतो, तर जिवंत राहिलो नसतो ! – अशीष मिश्रा

या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी. मी कुठल्याही प्रकारच्या चौकशीस सिद्ध आहे. ईश्‍वराचा आशीर्वाद म्हणून सुदैवाने मी घटनास्थळी नव्हतो. जर तेथे असतो, तर आज मी येथे तुमच्यासमोर नसतो, असा दावा आशीष मिश्रा यांनी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना केला.

आशीष मिश्रा पुढे म्हणाले की, जेव्हा ही घटना घडली, तेव्हा मी माझ्या गावात होतो. आमच्या ३ कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करून जिवे मारण्यात आले, तर माझ्या वाहनचालकाला जळत्या गाडीत ढकलण्यात आले. भारतातील शेतकरी असे करू शकत नाहीत.