सागरी किनारा मार्गाच्या कामात १ सहस्र ६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार ! – आशिष शेलार, आमदार, भाजप

आमदार आशिष शेलार

मुंबई – सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) कामात १ सहस्र ६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी २ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषदेत केला. मुंबई महापालिका हे काम करत असून या कामाची विशेष तपास पथकाद्वारे (एस्.आय.टी.) चौकशी करावी आणि सल्लागार आस्थापनाला काळ्या सूचीत टाकण्यात यावे, अशी मागणी शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय पर्यावरण विभागाने या कामाला अनुमती देतांना काही अटी घातल्या होत्या. त्यांचे पालन न केल्याने महापालिकेकडून स्पष्टीकरण मागवण्याची विनंती शेलार यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे. कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने या प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात आले आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे.

मुंबई सागरी किनारा रस्त्याच्या कामांमध्ये भरावासाठी वापरण्यात येणारे साहित्य हे प्रमाणित खाणींमधूनच घेतले जाते. तसेच या साहित्याची वेळोवेळी गुणवत्ता चाचणी केली जाते. त्यामुळे हे साहित्य अप्रमाणित असल्याचा आरोप चुकीचा असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. या कामात घोटाळा झाल्याचे आरोप प्रशासनाने फेटाळले आहेत.