गुरुमाऊली, मी तुजसी स्मरता ।
किती उपकार तू मजवरी केले,
हे आठवता ।
भान नसे गं माझे मजला ।
हे गुरुमाऊली, तुझ्या चरणी बोलले बोल अबोल कृतज्ञतेचे ।। १ ।।
वक्रमार्गी हा साधक जाता ।
साम-दाम-दंड देती त्याला ।
धर्मपिता पाठी असता ।
फणसाप्रती कठोर तत्त्वनिष्ठता ।
हे गुरुमाऊली, तुझ्या चरणी बोलले
बोल अबोल कृतज्ञतेचे ।। २ ।।
स्वभावदोष अहं नूरता ।
आतील गरे तू भरवसी त्याला ।
तुझ्या प्रीतीची जगी तोडही नसता ।
कृतज्ञतेने डोळे भरता ।
हे गुरुमाऊली, तुझ्या चरणी बोलले
बोल अबोल कृतज्ञतेचे ।। ३ ।।
नाही कळत गं मजला आता ।
तवचरणी मी देह अर्पिला ।
या ब्रह्माला जाणून घेता ।
गुरुविना हे ना कळे कुणा ।
हे गुरुमाऊली, तुझ्या चरणी बोलले
बोल अबोल कृतज्ञतेचे ।। ४ ।।
कृतज्ञतेचा भाव निराळा ।
शब्द अपुरा इथेची पडला ।
सांग गुरुराया काय करू आता ।
सर्वस्व अर्पण केले तुजला ।
हे गुरुमाऊली, तुझ्या चरणी बोलले
बोल अबोल कृतज्ञतेचे ।। ५ ।।
हीच प्रार्थना चरणी तुजला ।
जन्मोजन्मी ऋणी ठेवी तू मजला ।
या ऋणातून मुक्त न होता ।
तव चरणांसी मिळू दे विसावा ।
हे गुरुमाऊली, तुझ्या चरणी बोलले
बोल अबोल कृतज्ञतेचे ।। ६ ।।
– श्रीमती भाग्यश्री आणेकर, वाराणसी (ऑगस्ट २०२०)