भारतीय सनातन संस्कृतीमध्ये कृष्णद्वैपायन महर्षि श्रीवेदव्यासरचित वेद आहेत. या वेदांप्रमाणेच पुराणांना समान प्रतिष्ठा, मान्यता आणि प्रामाणिकता आहे. वस्तुत: भारतीय संस्कृती, तसेच मानव सभ्यतेचे पूर्ण परिचायक म्हणजे पुराणच आहेत. नारदपुराणाचे तर हे म्हणणे आहे की, ज्या गोष्टी वेदांमध्ये नाही, त्या सर्व स्मृतींमध्ये आहेत. ज्या गोष्टी या दोन्हींमध्ये आढळत नाहीत, त्या गोष्टी पुराणांमुळे ज्ञात होतात.
यन्न दृष्टं हि वेदेषु तत्सर्वं लक्ष्यते स्मृतौ ।
– नारदपुराण, उत्तरार्ध, अध्याय २४, श्लोक २०
अर्थ : जे वेदांमध्ये दिसत नाही, ते सर्व स्मृतींमध्ये आढळते.
उभयोः यन्न दृष्टं हि तत्पुराणैः प्रगीयते ।
– नारदपुराण, उत्तरार्ध, अध्याय २४, श्लोक २१
अर्थ : जे वेद आणि स्मृती या दोन्हींमध्ये आढळत नाही, ते पुराणांमध्ये आढळते.
पुराणांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य
पुराणांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये वेदांच्या तत्त्वदर्शकांना आख्यान्याच्या माध्यमातून समजावले आहे. ही आख्याने तत्त्वदर्शकांना शीघ्र गतीने, सहजतेने आत्मसात होऊ शकतील, अशा सोप्या पद्धतीने सर्वांना समजावलेली आहेत. पुराणांचे श्रवण आणि मनन हे अंत:करणाला पवित्र करण्याचे अन् भगवतप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. यासाठी पुराणांचे श्रवण आणि पारायण करण्याची सुदीर्घ परंपरा चालत आली आहे. पुराणांमध्ये सप्ताह पारायण, मास पारायण इत्यादी होतात.
(संदर्भ : मासिक ‘कल्याण’, वर्ष २०१७)