अवैधरित्या गुटख्याचा साठा सापडणे गंभीर आहे. पोलिसांनी आपली कार्यक्षमता वाढवायला हवी, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
सातारा, ४ ऑक्टोबर (वार्ता.) – लोणंद येथे अवैधरित्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती लोणंद पोलिसांना मिळाली. या माहितीवरून लोणंद पोलीस आणि अन्न अन् औषध प्रशासन यांनी धाड घालून अनुमाने १ लाख ८६ सहस्र रुपयांचा गुटखा शासनाधीन केला आहे. या प्रकरणी सागर शिंदे या संशयिताला कह्यात घेण्यात आले आहे.
लोणंद येथील गोटेमाळ परिसरामध्ये अवैधरित्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती लोणंद पोलिसांना मिळाली. याविषयी तातडीने वरिष्ठांना कळवण्यात आल्यावर पोलिसांच्या पथकाने धाड घालून कारवाई केली. घटनास्थळी विमल, आर्.एम्.डी. आणि हिरा या आस्थापनांचे १ लाख ८६ सहस्र रुपये मूल्याचा गुटखा आढळून आला.