जहाजावरून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ कह्यात !
अमली पदार्थ यंत्रणेचे संपूर्ण जाळे जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत ! – संपादक
मुंबई – अमली पदार्थ विरोधी पथकाने २ ऑक्टोबरला रात्री मुंबईजवळील समुद्रात असलेल्या ‘कॉर्डेलिया क्रूझ’ जहाजावर चालू असलेल्या एका ‘रेव्ह पार्टी’वर (अमली पदार्थ आणि मद्य यांच्या नशेसाठी आयोजित केलेल्या मेजवानीवर) धाड टाकली. या कारवाईमध्ये १० जणांना अटक करण्यात आली असून यांत अभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे. यांत काही नामवंत उद्योगपतींच्या मुलीही आहेत. या सर्वांची चौकशी चालू आहे, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली. जहाजातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थही कह्यात घेण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्यांना ३ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा मुंबईतील किल्ला न्यायालयात उपस्थित केले जाणार असल्याचे समजते.
‘कॉर्डेलिया क्रूझ’ हे जहाज मुंबईहून गोव्याला निघाल्यावर समुद्राच्या मध्यभागी पोचताच रेव्ह पार्टी चालू झाली. याची माहिती मिळताच अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. यामध्ये अमली पदार्थांची तस्करी करणार्या हरियाणा आणि देहली येथील दोन जणांसह पार्टीसाठी देहलीहून आलेल्या तीन मुलींनाही कह्यात घेण्यात आले. या पार्टीत प्रवेशासाठी प्रत्येकाने ८० सहस्र रुपयांपेक्षा अधिक रक्कम भरली होती.
पार्टी आयोजित केलेल्या ६ जणांची चौकशी करण्यात येणार आहे. आर्यन खान याच्यासह सर्वांचे भ्रमणभाष कह्यात घेण्यात आले असून त्यांची पडताळणी केली जात आहे.
अमली पदार्थविरोधी पथकाकडून ८ जणांची चौकशी !
वरील प्रकरणात समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंह, मोहक जसवाल, विक्रम छोकेर, गोमित चोप्रा यांची चौकशी चालू आहे. अरबाज मर्चंट हा आर्यन खानचा जवळचा मित्र आहे.
अधिकार्यांनी आर्यन खान याचे क्रूझवरील ‘व्हिडिओ’ मिळवले आहेत. एफ्टीव्ही इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक काशीफ खानद यांनाही संपर्क करण्यात आला आहे. ही पार्टी आयोजित करण्यात त्यांचा सहभाग असल्याची माहिती आहे.