भारतात येणार्‍या ब्रिटिश नागरिकांना १० दिवसांचे अलगीकरण अनिवार्य !

भारतीय नागरिकांना अलगीकरण अनिवार्य करणार्‍या ब्रिटनला भारताचे ‘जशास तसे’ प्रत्युत्तर !

सावरकरवाद अवलंबणार्‍या भारत सरकारचे अभिनंदन ! प्रत्येक क्षेत्रात अशी नीती अवलंबण्याची आवश्यकता आहे, तरच जगात भारताचा वचक निर्माण होईल आणि भारतियांना मान मिळेल ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – भारतातून ब्रिटनला जाणार्‍या दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १० दिवसांच्या अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय ब्रिटनने घेतल्यानंतर आता भारतानेही भारतात येणार्‍या सर्वच ब्रिटिश नागरिकांना १० दिवसांच्या सक्तीच्या अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासह ब्रिटीश नागरिकांना कोरोनाविषयीच्या ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा अहवाल सादर करावा लागणार आहे. ४ ऑक्टोबरपासून या निर्णयाची कार्यवाही करण्यात येणार आहे. ब्रिटिश नागरिकांच्या आगमनानंतर त्यांना ८ दिवसांनंतर पुन्हा कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक असेल. आरोग्य आणि नागरी हवाई वाहतूक या मंत्रालयांच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, आम्ही ‘जशास तसे’ धोरण स्वीकारण्याचे ठरवले आहे.

प्रारंभी ब्रिटनने भारतात सिद्ध करण्यात आलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीला नकार दिला होता; मात्र नंतर मान्यता दिली. तथापि भारतातून ब्रिटनमध्ये जाणार्‍या लोकांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी आणि १० दिवसांचे अलगीकरण सक्तीचे करण्यात आले होते.