भाद्रपद आणि आश्विन या मासांतील (३.१०.२०२१ ते ९.१०.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस अन् त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘६.१०.२०२१ या दिवशी भाद्रपद मास संपत असून ७.१०.२०२१ पासून आश्विन मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

‘साप्ताहिक शास्त्रार्थ’

१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, वर्षाऋतू, भाद्रपद मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे. ७.१०.२०२१ पासून आश्विन मास, शुक्ल पक्ष आणि शरदऋतू चालू होणार आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

सौ. प्राजक्ता जोशी

२ अ. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. ३.१०.२०२१ या दिवशी रविवार असून रात्री १०.३० पर्यंत द्वादशी तिथी असल्याने ‘दग्ध योग’ आहे.

२ आ. यमघंट योग : रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. प्रवासासाठी या योग पूर्णतः वर्ज्य करावा. रविवारी ३.१०.२०२१ या दिवशी सूर्याेदयापासून उत्तररात्री ३.२६ पर्यंत मघा नक्षत्र असल्याने यमघंट योग आहे.

२ इ. संन्यासिनां महालय : संन्यासी व्यक्तीचे महालय श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला करतात.

२ ई. सोमप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. सोमवारी येणार्‍या त्रयोदशी तिथीला ‘सोमप्रदोष’ म्हणतात. ४.१०.२०२१ या दिवशी सोमप्रदोष आहे. जीवनातील कोणत्याही प्रकारची न्यूनता आणि आर्थिक अडचणी नष्ट करण्यासाठी, तसेच आरोग्यप्राप्तीसाठी ‘सोमप्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष व्रतामध्ये सोमवारी येणार्‍या प्रदोष व्रताला विशेष महत्त्व आहे. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. या दिवशी शिवकवच आणि शिवमहिम्नस्तोत्र वाचावे.

२ उ. युगादि : भाद्रपद कृष्ण त्रयोदशी या तिथीला कलियुगाचा प्रारंभ झाल्याने ‘युगादि योग’ होतो. या दिवशी ‘युगांतर व्रत’ करतात. ‘श्रीविष्णूच्या मूर्तीला तूप, दूध आणि शुद्धोदक यांनी स्नान घातल्यास विष्णुलोकाची प्राप्ती होते’, असे मानले जाते. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे.

२ ऊ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. ४.१०.२०२१ या दिवशी रात्री ९.०६ पासून दुसर्‍या दिवशी सकाळी ८.०९ पर्यंत आणि ९.१०.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.२१ पासून उत्तररात्री ४.५६ पर्यंत विष्टी करण आहे.

२ ए. शस्त्रादिहत पितृश्राद्ध : जो मनुष्य, प्राण्याच्या दंशाने किंवा विषाने, तसेच शस्त्राच्या आघाताने मृत झाला असेल किंवा त्याची हत्या झाली असेल, तर त्या व्यक्तीचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण चतुर्दशीला केल्यास त्याचा आत्मा तृप्त होतो. भाद्रपद कृष्ण चतुर्दशीला ‘अघोर चतुर्दशी’ असे नाव आहे.

२ ऐ. सर्वपित्री दर्श अमावास्या (भादवी पोळा) : अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्‍या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) हे ‘दर्श’ संज्ञक मानतात. भाद्रपद अमावास्या तिथीला साजरा करण्यात येणार्‍या बैलाच्या सणाला ‘भादवी पोळा’ म्हणतात. ५.१०.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.०५ पासून ६.१०.२०२१ या दिवशी सायंकाळी ४.३५ वाजेपर्यंत अमावास्या तिथी आहे.

२ ओ. गजच्छाया योग : भाद्रपद अमावास्येस सूर्य आणि चंद्र हस्त नक्षत्रात असतांना ‘गजच्छाया योग’ होतो. या योगावर स्नान करणे, तसेच दान करणे पुण्यकारक आहे. ६.१०.२०२१ या दिवशी गजच्छाया योग आहे.

२ औ. घटस्थापना, नवरात्रारंभ : आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रारंभ होतो. या वर्षी ७.१०.२०२१ या दिवशी नवरात्रारंभ आहे. या दिवशी ‘घटस्थापना’ किंवा ‘कलशस्थापना’ करण्याला विशेष महत्त्व असते. शरदऋतूमध्ये आश्विन मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रीपर्यंत होणार्‍या देवीमातेच्या उत्सवाला ‘शारदीय नवरात्र’ असे म्हणतात. नवरात्रीत अखंड नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करतात. प्रतिपदेपासून नवरात्रीपर्यंत नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात. १. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी, ३. चंद्रघंटा, ४. कूष्मांड, ५. स्कंदमाता, ६. कात्यायनी, ७. कालरात्री, ८. महागौरी आणि ९. सिद्धीदात्री, अशी देवीची नऊ रूपे आहेत. धर्मग्रंथ आणि पुराण यांनुसार श्री दुर्गादेवीची उपासना करण्यासाठी ‘शारदीय नवरात्र’ हा उत्तम काळ आहे. नवरात्रकाळात ‘कुंकूमार्चन करणे, देवीमाहात्म्य वाचणे, देवीला फुलांच्या माळा घालणे, तसेच सप्तशती ग्रंथाचे वाचन करणे’, यांना विशेष महत्त्व आहे.

२ अं. मातामह श्राद्ध : आश्विन शुक्ल प्रतिपदा तिथीला ‘मातामह श्राद्ध’ करतात. मातामह श्राद्ध (दौहित्र) म्हणजे आईच्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ नातवाने केलेले श्राद्ध होय.

२ क. चंद्रदर्शन : अमावास्येनंतर चंद्राचे ‘चंद्रकोर’ रूपात प्रथम दर्शन होते. हिंदु धर्मात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदर्शन होणे भाग्यकारक आहे; कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सूर्यास्तानंतर लगेचच केवळ थोड्या वेळासाठी चंद्रकोर दिसते. या तिथीची देवता ब्रह्मा आहे. ७.१०.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.१८ पर्यंत चंद्रदर्शन आहे.

२ ख. इष्टी : इष्टी म्हणजे यज्ञ. यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो, त्यास ‘इष्टी’ म्हणतात. प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या तिथीनंतर येणार्‍या प्रतिपदेला पंचांगात ‘इष्टी’ असे लिहिलेले असते.

२ ग. विनायक चतुर्थी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ‘विनायक चतुर्थी’ म्हणतात. या दिवशी श्री विनायक (गणेश) व्रत करतात. या दिवशी श्री विनायकी चतुर्थी माहात्म्य, व्रतकथा आणि ‘श्री विनायक अष्टोत्तरशत नामस्तोत्र’ वाचतात. या उपासनेने सर्व कार्य सिद्ध होते. ९.१०.२०२१ या दिवशी विनायक चतुर्थी आहे.

२ घ. सप्तरात्रोत्सवारंभ : नवरात्रीपूर्वी अशौच आल्याने प्रतिपदा तिथीला घटस्थापना करता येणार नसेल, तर अशौच संपल्यावर सप्तरात्रोत्सवारंभ, पंचरात्रोत्सवारंभ, त्रिरात्रोत्सवारंभ किंवा एकरात्रोत्सवारंभ, असे पंचांगात दिलेल्या दिवशी कमी दिवसांचे नवरात्र करावे. सप्त रात्रोत्सवारंभात आश्विन शुक्ल त्रयोदशीपासून नवमीपर्यंत सात दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करतात.

२ च. क्षय दिन : ९.१०.२०२१ या दिवशी ‘क्षय दिन’ आहे. ज्या तिथीच्या वेळी सूर्याेदयाची वेळ नसते, ती ‘क्षय तिथी’ असते. क्षय तिथी शुभकार्यासाठी वर्ज्य असते.

टीप १ – दग्ध योग, प्रदोष, शिवरात्री, भद्रा (विष्टी करण), अन्वाधान आणि विनायक चतुर्थी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२६.९.२०२१)