१. साधकांनी विष्णूला प्रिय असलेल्या तुळशीला करावयाचे प्रार्थनादी उपाय !
१ अ. साधकांनी सेवेसाठी घरातून बाहेर पडतांना तुळशीला प्रार्थना आणि सेवा करून घरी आल्यावर तुळशीला कृतज्ञता व्यक्त करावी ! : ‘प्रत्येक साधकाच्या घराबाहेर तुळस असावी. घरातून सेवेसाठी बाहेर पडतांना साधकांनी तुळशीला प्रार्थना करावी, ‘हे विष्णुप्रिया, आम्ही गुरुसेवेसाठी बाहेर जात आहोत. तू आमच्या घराचे रक्षण कर. आमच्या धनधान्याचे रक्षण कर.’ सर्व सेवा करून घरी परत आल्यावर घराचे रक्षण केल्याबद्दल प्रथम तुळशीला कृतज्ञता व्यक्त करावी आणि नंतरच घराच्या आत जावे.
१ आ. अनेक दिवसांसाठी बाहेरगावी जातांना साधकांनी तुळशीला प्रार्थना करून तिची कापूर-आरती करावी ! : साधक अनेक दिवसांसाठी घरातून बाहेर जात असल्यास, उदा. साधक बाहेरगावी जात असल्यास त्यांनी तुळशीला प्रार्थना करावी आणि तुळशीची कापूर-आरती करावी. बाहेरगावाहून घरी परतल्यावरही साधकांनी एकदा तुळशीची कापूर-आरती करावी.’
– सप्तर्षी (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून, २१.४.२०२१ (श्रीरामनवमी), रात्री ९ वाजता)
(‘सप्तर्षींकडून असे उपाय कळण्याच्या काही मास अगोदर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, यांनी दौर्यातील साधकांना चेन्नई, तमिळनाडू येथे असलेल्या सनातनच्या सेवाकेंद्राच्या बाहेर तुळस ठेवायला सांगितले होते. यावरून ‘गुरुतत्त्व आणि सप्तर्षी एकच आहेत’, हे लक्षात येते.’ – संकलक)
२. साधकांनी वरीलप्रमाणे उपाय करूनही घरी काही विपरीत घडल्यास त्यामागील कारणीभूत घटक !
‘वरीलप्रमाणे उपाय करूनही घरी काही विपरीत घडल्यास साधकांनी खालील सूत्रे लक्षात घ्यावीत,
अ. साधक किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्याकडून अयोग्य क्रियमाण घडणे
आ. साधकांच्या प्रारब्धातील देवाण-घेवाण हिशोब अटळ असणे
इ. साधकांची देवावरील श्रद्धा न्यून पडणे
ई. साधकांची साधना अल्प असणे
या सर्व गोष्टीही कारणीभूत असू शकतात. त्यामुळे साधकांनो, सप्तर्षींनी सांगितलेल्या उपायांचा लाभ करून घेण्यासाठी आपली साधना आणि देवावरील श्रद्धा वाढवा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.९.२०२१)