मराठवाड्यात पुराने थैमान घातले असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोहळे चालू आहेत !

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची टीका

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे

बीड – ‘मराठवाड्यात एकीकडे पुराने थैमान घातले असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोहळे चालू आहेत’, अशी टीका भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. मागील २ वर्षांपासून शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नसून तातडीने नजर पंचनामे करून शेतकर्‍यांना साहाय्य देण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी या वेळी केली. त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, पूरग्रस्तांना तातडीने साहाय्य देण्यासाठी सर्वात आधी प्रशासन आणि शासन यांनी पुढाकार घ्यायला हवा. आम्ही बांधांवर पोचल्यावर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे शेतकर्‍यांच्या बांधावर गेले. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठमोठे सोहळे चालू होते.