‘गुलाब’ वादळामुळे झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतीपिकांची हानी !

सोलापूर, २९ सप्टेंबर – ‘गुलाब’ वादळामुळे गेल्या ३ दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊन शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. मराठवाड्यात प्रथमच १४९.१ टक्के पाऊस झाला असून २० लाख हेक्टरवरील उभ्या पिकांची हानी झाली आहे. काही ठिकाणी पिके सडली आहेत. शेतकर्‍यांची मोठी हानी झाल्याने सरकारने तात्काळ साहाय्य करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

नांदेड जिल्ह्यात सहस्रो हेक्टरवरील पिके पाण्याखाली !

नांदेड – अतीवृष्टीमुळे अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना महापूर आला आहे. शेत-शिवारासह अनेक गावांतही पाणी शिरले आहे. यामुळे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, पिंपळगाव, सांगवी, मेंढला, शेणी या गावांचा संपर्क तुटला आहे, तर काढणीस आलेले सोयाबीन पूर्णपणे भूईसपाट झाले आहे. पैनगंगा नदीवरील इसापूर धरणाचे ११, तर गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे ९ दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात विसर्ग चालू आहे.  सोयाबीन, कापूस आदी खरीप पिकांसह हळद, केळी, ऊस बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे.

वाशीम

जिल्ह्यात गेल्या ८ ते १० दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. काढणीला आलेले सोयबीन, उडीद, मुग या पिकांची मोठी हानी झाली आहे; मात्र अद्याप पंचनामे झालेले नाहीत.

जळगाव

जिल्ह्यातही मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने डोंगरी आणि तितूर या नद्यांना पूर आला. यामुळे चाळीसगाव शहरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले.

संभाजीनगर

जायकवाडी धरण

पावसामुळे जायकवाडी धरणात १ लाख २१ सहस्र क्युसेक्स पाण्याची आवक चालू असल्याने धरण ९५ टक्के भरले आहे. यामुळे धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

धाराशिव

येथे पावसामुळे सौंदणा, वाकडी आणि दाऊतपूर येथील नागरिकांच्या घरांना पाण्याने वेढले होते. २८ सप्टेंबर या दिवशी दाऊतपूर आणि सौंदणा येथील १६ जणांना ‘एन्.डी.आर्.एफ्.’च्या पथकाने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने वाचवले, तर वाकडी येथील १७ जणांचे प्राण जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने बोटीच्या साहाय्याने वाचवले, तसेच ४३९ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.