गड आणि किल्ले यांची दुरवस्था लवकर दूर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी ! – संपादक
मुंबई, २९ सप्टेंबर (वार्ता.) – गड-किल्ले यांचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी सुकाणू समितीचे सदस्य आणि शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांची भेट घेऊन हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे अन् रायगड जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार यांनी त्यांना राज्यातील दुरवस्था झालेल्या किल्ल्यांची माहिती दिली. या वेळी त्यांना विशाळगडावरील अतिक्रमण, जळगाव येथील पारोळा गडाची दुरवस्था, तसेच सातारा येथील चंदनगडावरील अतिक्रमण यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. श्री. चोपदार यांनी याविषयीची छायाचित्रेही त्यांना दाखवली. सातारा जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्री. हणमंतराव चवरे हेही या प्रसंगी उपस्थित होते.
या भेटीत प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी किल्ल्यांच्या दुरवस्थेविषयी पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती देण्याची सिद्धता दर्शवली. यासाठी ऑक्टोबर मासात होणार्या सुकाणू समितीच्या बैठकीला हिंदु जनजागृती समितीच्या पदाधिकार्यांना उपस्थित रहाण्यासही त्यांनी सांगितले. राज्यातील गडकोट किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुकाणू समिती गठित केली आहे. स्वत: उद्धव ठाकरे या समितीचे अध्यक्ष असून उपमुख्यमंत्री अजित पवार उपाध्यक्ष आहेत. राज्यातील कोणत्या किल्ल्यांचे संवर्धन करावे ? याचे प्राधान्य या समितीच्या वतीने निश्चित केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पुणे येथील शिवनेरी, तोरणा आणि राजगड (पुणे), सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग अन् सिंधुदुर्ग किल्ला, रायगड येथील सुधागड या किल्ल्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी शासनाकडून १०१ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे.