अल्पवयीन मुलाने संन्यास घेणे वैध ! – कर्नाटक उच्च न्यायालय

राज्यघटनेमध्ये बालकांनी संन्यास घेण्यावर बंधन नाही ! – न्यायालयाची स्पष्टोक्ती

बेंगळुरू (कर्नाटक) – अल्पवयीन मुलगा बाल संन्यासी होऊ शकतो. त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही, असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायाधीश सचिन शंकर मकदूम यांच्या खंडपिठाने हा आदेश दिला. १६ वर्षीय अनिरुद्ध सरलतया (आता वेदवर्धना तीर्थ) यांना उडुपी येथील शिरूर मठाचे मठाधिपती करण्याच्या विरोधात न्यायालयात आव्हान देणारी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. न्यायालयाने वरील निकाल देत ही याचिका फेटाळून लावली.

१. न्यायालयाने म्हटले की, अन्य धर्मांमध्ये म्हणजे जसे बौद्धांमध्ये लहान मुले भिक्षू बनतात, तसे संन्यासी बनता येऊ शकते. अमूक वयाच्या व्यक्तीनेच संन्यास घ्यावा किंवा दीक्षा घ्यावी, असा कोणताही नियम नाही. १८ वर्षांखालील व्यक्तीला संन्यास दिला जातांना रोखले जावे, असा कोणताही कायदा नाही. धर्मग्रंथांतील माहितीनुसार धर्म कोणत्याही व्यक्तीला वयाच्या १८ वर्षांपूर्वी संन्यास घेण्याची अनुमती देतो. ही प्रथा ८०० वर्षांपासून चालू आहे.

२. बाल संन्यासाच्या विरोधात करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले होते की, अल्पवयीन मुलाला भौतिक जीवनाचा त्याग करण्यास बाध्य करणे हे राज्यघटनेच्या अनुच्छेद २१चे उल्लंघन आहे. अनुच्छेद २१ भारतीय नागरिकाला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते.

३. न्यायालयाने या प्रकरणावर ज्येष्ठ अधिवक्ता एस्.एस्. नागानंद यांना ‘न्याय मित्र’ (न्यायालयाला साहाय्य करणारा) म्हणून नेमले होते.