पाकच्या सैन्याने पैशांचे आमीष दाखवून मला आतंकवादी बनवले !

अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी आतंकवाद्याची स्वीकृती !

नवी देहली – मला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी पैशांचे आमीष दाखवून लष्कर-ए-तोयबामध्ये जाण्यास सांगण्यात आले. मला पाकिस्तानी सैन्याने प्रशिक्षण देऊन पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.कडे सोपवले होते. पाकिस्तानी सैन्याच्या साहाय्याविना कुणीही भारतात घुसखोरी करू शकत नाही. मी लष्कर-ए-तोयबात सहभागी झाल्यानंतर मला २० सहस्र रुपये देण्यात आले होते. मला काश्मीरमध्ये पाठवल्यानंतर माझ्या कुटुंबाला ३० सहस्र रुपये देण्यात येणार होते, अशी माहिती काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेला १९ वर्षीय पाकिस्तानी आतंकवादी अली बाबर याने चौकशीमध्ये दिली आहे. बाबरच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. तो आई आणि बहिण यांच्यासमवेत रहात होता. आईच्या उपचारासाठी त्याला पैशांचे आमिष दाखवण्यात आले होते. यावरून अली बाबर आणि त्याच्यासारख्या अनेक तरुणांना पाकिस्तानी सैन्य पैशांचे आमिष दाखवत दिशाभूल करत आहे. तसेच त्यांना आतंकवादाचे प्रशिक्षण देत आहे, अशी माहिती भारतीय सैन्याने दिली.

काश्मिरी मुसलमान आनंदी दिसले ! – आतंकवादी अली बाबर

अली बाबर म्हणाला की, काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले; मात्र मला तसे काहीच दिसले नाही. भारतीय सैन्याने मला चांगली वागणूक दिली. मला मारहाण झाली नाही किंवा छळही झाला नाही. मला येथे जे लोक दिसले ते आनंदी दिसले. पाकिस्तानमधील माझ्यासारख्या तरुणांना मला सांगायचे आहे की, जिहाद वाईट आहे.