‘अ‍ॅमेझॉन’ दुसरी ईस्ट इंडिया कंपनी ! – ‘पांचजन्य’ नियतकालिकाची टीका

नवी देहली – ‘अ‍ॅमेझॉन’ हे आस्थापन म्हणजे दुसरी ईस्ट इंडिया कंपनी आहे, अशी टीका ‘पांचजन्य’ या नियतकालिकाने केली आहे. ‘पांचजन्य’च्या मागील अंकातून  ‘इन्फोसिस’ आस्थापनावर टीका करतांना तिच्या माध्यमांतून नक्षलवाद्यांना साहाय्य केले जात असल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र त्याच वेळी या विषयीचा कोणताही पुरावा नसल्याचेही या नियतकालिकाने स्पष्ट केले होते.

‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी ‘पांचजन्य’च्या नवीन अंकाचे मुखपृष्ठ ट्वीट केले आहे. यावर ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचे छायाचित्र दिसत आहे. त्यावर अंकाचा मथळा, ‘#अ‍ॅमेझॉन : ईस्ट इंडिया कंपनी २.०’ असे लिहिण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच ‘या आस्थापनाने असे काय चुकीचे केले आहे की, त्यांना लाच द्यावी लागली ? लोक हे आस्थापन भारतातील नवउद्योजक, आर्थिक स्वातंत्र्य आणि संस्कृती यांना धोकादायक असल्याचे का मानतात ?’, अशी वाक्येही लिहिण्यात आली आहेत. मागच्याच आठवड्यामध्ये भारत सरकारने भारतात ‘अ‍ॅमेझॉन’च्या कायदेशीर प्रतिनिधींकडून सरकारी अधिकार्‍यांना लाच दिल्याच्या आरोपांची चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.