आतंकवादमुक्त भारत केव्हा ?

 संपादकीय

पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्यासाठी सरकारला सैन्याला आदेश द्यावेत,  हि अपेक्षा !

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत केलेल्या भाषणाचा भर हा आतंकवादावर होता. पाकिस्तानचे नाव न घेता त्यांनी पाकला खडसावले. ‘आतंकवादाचा राजकीय हत्यार म्हणून उपयोग करणार्‍यांवरच तो उलटेल, तसेच कुणाच्याही भूमीचा उपयोग आतंकवाद पोसण्यासाठी किंवा आतंकवादी आक्रमणांसाठी होता कामा नये’, असे त्यांनी सांगितले. आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकचे नाव कुप्रसिद्ध आहेच; मात्र त्याच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ती रोखण्यासाठी चर्चा, परिषदा यांद्वारे चेतावण्या देण्याच्या पलीकडे काही कृती होत नाही, ही खेदजनक गोष्ट आहे.

त्यापूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतावर टीका करतांना नेहमीप्रमाणे काश्मीरचा राग आळवला. ‘दक्षिण आशियातील शांतता जम्मू-काश्मीर वादाच्या निराकरणावर अवलंबून आहे’, असे त्यांनी सांगितले. या त्यांच्या भाषणावर संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी कठोर शब्दांत टीका केली होती. ‘पाकव्याप्त काश्मीर रिकामे करून ते भारताच्या स्वाधीन करा. पाकिस्तान स्वत: आतंकवाद्यांचा आश्रयदाता देश असून त्याने ओसामा बिन लादेनला आश्रय दिला होता. आतंकवादाचे समर्थन, आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणे, पैसे आणि शस्त्रास्त्रे पुरवणे ही पाकची भूमिका आहे आणि त्यांच्या नियोजनाचा भाग आहे’, असे दुबे यांनी प्रत्युत्तर दिले. स्वत: आतंकवाद पोसून दुसर्‍यांकडे बोट दाखवणार्‍या पाकवर केवळ शाब्दिक प्रहार करणे पुरेसे नाही. त्याला शब्दांची भाषा समजत नाही. त्याही पुढे जाऊन त्याला ‘गोबेल्स’प्रमाणे धादांत खोटी माहिती पसरवण्यात तो निष्णात आहे.

पाक डावपेचांत वरचढ !

काही दिवसांपूर्वी आसाम येथे स्थानिक पोलीस भूमीवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी गेल्यावर तेथील शस्त्रसज्ज धर्मांध अतिक्रमणकर्त्यांनी पोलिसांवर आक्रमण केले. यामध्ये अनेक पोलीस गंभीररित्या घायाळ झाले, तर स्वरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात २ धर्मांध ठार झाले. या घटनेचा अपलाभ पाकने घेऊन ‘भारतात मुसलमानांवर अत्याचार करण्यात येतात’, असा कांगावा केला. ‘चोर तो चोर वर शिरजोर’, असे पाकचे वर्तन आहे. त्यापूर्वी २ दिवस ‘भारतच आतंकवादाला खतपाणी घालत आहे’, असे विधान पाकने केले. यातून पाक डावपेचांत भारतापेक्षा वरचढ होऊ पहात आहे. चीन झिनझियांग प्रांतातील उघूर जातीच्या मुसलमानांवर पुष्कळ अत्याचार करत आहे; मात्र त्याविषयी पाक अवाक्षरही काढत नाही, भारतात कुठे मुसलमानांविषयी काही झाले, तर मात्र भारताचा विरोध करण्यासाठी पाक याचा अपलाभ उठवतो.

शिशुपाल हा भगवान श्रीकृष्णाची सातत्याने निंदा करायचा. शिशुपालाचे १०० अपराध भरल्यावर भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध केला होता. पाक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात भारतात आतंकवादी कारवाया करतो, वर भारतावर आरोप करतो. याउलट देशात घुसलेल्या आतंकवाद्यांवर कारवाई करून भारत शांत रहातो. आतंकवादाचा उद्गाता देश पाक सुरक्षित रहातो. सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांनी सैन्याचे नेतृत्व स्वीकारल्यावर ‘सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर आपलेच’, अशी घोषणा केली होती. सैन्यदल प्रमुखांच्या या घोषणेनंतर सर्वांनाच भारत लवकरच कारवाई करून पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेईल, असे वाटत होते. काश्मीर मधील कलम ३७० हटवल्यावर संसदेत झालेल्या चर्चेत गृहमंत्री अमित शहा यांनी ‘पाकव्याप्त काश्मीर लवकरच कह्यात घेऊ’, असे सांगितले होते. भारताकडून अशा प्रकारे कृती करण्याची सिद्धता केली जाते; मात्र प्रत्यक्ष कृती केव्हा होणार ?, याची जनता प्रतीक्षा करते.

स्वबळावर कृती हवी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ‘व्हाईट हाऊस’मध्ये घेतलेल्या द्विपक्षीय बैठकीमध्ये आतंकवाद्यांवर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये (२६ /११) मोठे आतंकवादी आक्रमण झाले. या आक्रमणामध्ये १६६ लोक मृत्यूमुखी पडले, तर ३०० जण घायाळ झाले. या वेळी अनेक पोलीस अधिकारीही हुतात्मा झाले. तेव्हा देशात आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार होते. आक्रमणाला १० हून अधिक वर्षे उलटून गेली आहेत, तरी लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अजूनही जिवंत आहे. या कटाचे सर्व सूत्रधार पाकमध्येच आहेत. पाकमधील आतंकवादी संघटनेने आक्रमण केले, याचे ढीगभर पुरावे भारताने पाकला दिले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पाकने केवळ दाखवण्यासाठी थातुरमातुर कारवाई केली. काही आतंकवाद्यांना तर सोडूनही दिले आहे. भारताच्या आर्थिक राजधानीवर एवढे मोठे आतंकवादी आक्रमण होऊन आणि त्या पूर्वी अनेक बॉम्बस्फोट होऊनही पाकवर काहीच कारवाई झाली नाही, याची जनतेला चीड वाटते. भारत पाकवर कारवाई करणार आहे कि नाही, याची चौकशी विदेशातील लोक करत होते; मात्र तत्कालीन काँग्रेस सरकार ढीम्मच ! आता प्रखर राष्ट्रवादी नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. अमेरिका तोंडी का असेना पाठिंबा देत आहे. दोघांनीही २६/११ च्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा पुनरुच्चार केला आहे, तर विलंब कशासाठी ? अमेरिकेचे आतंकवादाविषयीचे धोरण हे दुटप्पीपणा किंवा स्वार्थीपणाचे राहिले आहे. अमेरिका जगाची ‘मसिहा’ बनून अनेक देशांतील आतंकवादाविरुद्ध लढाई लढली आहे; मात्र कोणत्याही देशातील आतंकवादाचा नायनाट तिने केलेला नाही, हेसुद्धा खरे आहे. केवळ स्वत:च्या हितसंबंधांच्या आड येणार्‍या आतंकवादी गटांवर तिने कारवाई केली आहे. अफगाणिस्तानात २० वर्षे पाय रोवूनही अमेरिकेला तालिबानला नष्ट करता आले नाही. त्यामुळे भारताने अमेरिकेवर विसंबून न रहाता स्वत:चे सैन्य सामर्थ्य, शस्त्रसामर्थ्य वापरून पाकचे अस्तित्व आतंकवाद्यांसह नष्ट करावे आणि ‘आतंकवादमुक्त भारत’ निर्माण करावा, ही अपेक्षा !