तालिबानचे सरकार आणि जागतिक घडामोडी !

आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये घुसण्याच्या आधीच भारताने त्यांचे तळ कायमचे नष्ट करावेत ! – संपादक

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

१. तालिबानने लढाईसाठी साहाय्य करणारे पाकिस्तान, चीन आणि इराण यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देणे

‘सध्या अफगाणिस्तानमध्ये वेगाने घडामोडी घडत आहेत. पाकिस्तान आणि चीन यांनी तालिबानला लढाई करण्यासाठी साहाय्य केले होते. त्यामुळे तालिबानने पाकिस्तान आणि चीन यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. अर्थात् त्यांना बोलावणे तालिबानला क्रमप्राप्त होते. या देशांनी तालिबानला नियोजन करून दिले. गुप्तचर माहिती दिली, दारूगोळा पुरवला आणि शस्त्रे पुरवली. एवढेच नाही, तर चांगल्या प्रकारचे उपग्रह आणि छायाचित्रेही पुरवली. सध्याचा अफगाणिस्तान हा भूवेष्टित (भूप्रदेश असलेला) देश असून त्यांना समुद्र लाभलेला नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी त्यांना इराणचे साहाय्य घेणे आवश्यक ठरते. त्यामुळे त्यांनी इराणलाही शपथविधी सोहळ्याला बोलावले होते.

२. तालिबानचा सर्वाेच्च नेता आणि अफगाणी धर्मगुरु मुल्ला महंमद अखुंदजादा !

मुल्ला महंमद अखुंदजादा हा तालिबानचा सर्वाेच्च नेता आहे. (महंमद अखुंदजादा याची हत्या झाल्याची बातमी माध्यमांमध्ये प्रसारित झाली; पण या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. – संपादक) तालिबानच्या सरकारमध्ये अनेक आतंकवादी आहेत. ते अल् कायदा आणि इसिस यांसारख्या विविध आतंकवादी संघटनांना साहाय्य करत आहेत. अल् कायदाने आधीच सांगितले आहे की, ते ३० देशांमध्ये आतंकवादी कारवाया करणार आहेत. त्यात भारताच्या नावाचाही समावेश आहे. केवळ चेचेन्या आणि चीनच्या शिंनजियांग यांची नावे नाहीत. त्यामुळे ते जगाला डोकेदुखी ठरणार आहेत.

मुल्ला महंमद अखुंदजादा हा सैनिकी नेता नसून तो अफगाणी धर्मगुरु आहे. त्याला लढायांचा अनुभव नाही. प्रामुख्याने धर्म आणि आतंकवाद यांची धोरणे ठरवण्यामध्ये त्याचा सहभाग होता. त्याच्या आधीचे नेते मारले गेल्याने त्याची बढती होऊन तो प्रमुख नेता झाला. अखुंदजादा हा वर्ष २००१ मध्ये तालिबानच्या सरकारमध्ये उपराष्ट्रपती होता. जेव्हा तालिबानची स्थापना झाली, तेव्हा संस्थापक सदस्यांमध्येही तो होता. मुल्ला उमरचा मुलगा हा क्रमांक एकचा नेता होता आणि हक्कानी गटाचा सिराजुद्दीन हा क्रमांक दोनचा नेता होता. हक्कानी हा पाकसमर्थक गट आहे. त्यामुळे अखुंदजादा हा तडजोडीचा उमेदवार म्हणून पुढे आला आहे.

बामियान खोर्‍यातील प्राचीन बुद्ध मूर्ती

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

३. जागतिक स्तरावर महत्त्व वाढवण्यासाठी तालिबानने गौतम बुद्धांची मूर्ती फोडणे आणि ती फोडण्यासाठी केलेले प्रयत्न

अफगाणिस्तान सरकारने तालिबान नेत्यांना मारण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. मुल्ला अखुंदजादावरही अनेक आक्रमणे झाली; पण त्यातून तो बचावला. बामियान खोर्‍यामध्ये अतिशय प्राचीन बुद्ध मूर्ती होती. तिला फोडण्याचा आदेश अखुंदजादानेच दिला होता. त्या वेळी आतंकवादी संघटनांमध्ये स्पर्धा होती. त्या काळात अल् कायदाला अधिक प्रसिद्धी मिळत होती. त्यामुळे तालिबानने प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी बुद्ध मूर्तीला फोडण्याचा फतवा काढला. ती मूर्ती दगडांमध्ये कोरलेली होती. त्यामुळे ती एवढी बलशाली होती की, अनेक प्रयत्न करूनही तालिबानला तिला फोडणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी मूर्तीवर तोफा आणि रणगाडे यांमधून बाँबगोळे सोडले, तरीही ती मूर्ती फुटली नाही. शेवटी त्यांनी मूर्तीमध्ये यंत्राच्या साहाय्याने छिद्रे पाडली आणि त्यात स्फोट घडवून आणले. त्यानंतर त्यांना मूर्ती फोडण्यात यश आले. त्या घटनेनंतर जगात तालिबानचे महत्त्व एकदम वाढले.

४. तालिबानचा गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी हा भारतासाठी धोकादायक !

तालिबानचे सरकार हे भारतासाठी अतिशय धोकादायक आहे. या सरकारमध्ये ‘हक्कानी’ नेटवर्कचे सिराजुद्दीन याला गृहमंत्री करण्यात आले आहे. सिराजुद्दीन ‘आयएस्आय’ या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे बाहुले आहे. हक्कानी नेटवर्कने यापूर्वीही भारतामध्ये आतंकवाद वाढवण्यासाठी पाकिस्तानला साहाय्य केलेले आहे. त्यामुळे हक्कानी तेथील तालिबानी आतंकवाद्यांना भारतामध्ये पाठवण्याचा प्रयत्न करील. हक्कानीची लष्कर-ए-तोएबा, जैश-ए-महंमद, अल् बदर यांसारख्या आतंकवादी गटांशी मैत्री आहे. काही दिवसांपूर्वी जैश-ए-महंमदचा प्रमुख मौलाना मसूद हा आतंकवाद वाढवण्यासंदर्भात हक्कानीला भेटण्यासाठी गेला होता. अनेक आतंकवादी हे काश्मीरमध्ये घुसण्याच्या सिद्धतेत आहेत. त्यामुळे भारताला सावध रहावे लागणार आहे.

५. अफगाणिस्तानमधील लोकांचा पाकिस्तानच्या विरोधात असंतोष !

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन झालेले आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानच्या लोकांमध्ये पाकिस्तानविषयी प्रचंड असंतोष पसरला आहे. अनेक नागरिक सहस्रोंच्या संख्येने काबूलमध्ये आलेले आहेत. उत्तरेच्या प्रांतांमध्येही असंतोष पसरत आहे. पाकिस्तान आणि आयएस्आय यांच्यामुळे अफगाणिस्तानच्या सहस्रो लोकांना पलायन करावे लागले. अनेक जण मारले गेले, तर काही घायाळ झाले आहेत. त्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. महिलांवर पुष्कळ अत्याचार होत आहेत. त्यामुळे तेथील लोक पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने करत आहेत.

६. अमेरिका निष्क्रीय झाल्यामुळे आंदोलने करून काहीही निष्पन्न न होणे

तालिबानच्या विरोधात अमेरिकेत आंदोलने चालू आहेत; पण आंदोलने करून काहीही लाभ होणार नाही; कारण अमेरिका अफगाणिस्तानमधून निघून गेली आहे आणि अमेरिका तेथे काहीही करण्याच्या मनःस्थितीत नाही. अशा स्थितीत अमेरिका एक अतिशय निष्क्रीय लष्करी शक्ती झालेली आहे. त्यामुळे तेथे कुणीही निदर्शने केली, तरी त्यातून काहीतरी निष्पन्न होण्याची शक्यता अल्प आहे.

७. पंजशीर हे तालिबान विरोधातील लढाईचे मुख्य केंद्र होणे

अमेरिका आणि रशिया यांना पंजशीर खोरे कह्यात घेता आले नव्हते. ते ‘नॉर्दन अलायन्स’चे मुख्य कार्यालय होते. पंजशीरमध्ये कुजबेकी, ताजिकी आणि तुर्कमेनिस्तान यांचे लोक एकत्र आले आहेत, म्हणजे तेथे पश्तुन आणि पठाण नसलेल्या लोकांची आघाडी निर्माण करण्यात आली आहे. त्यांचा नेता अहमद मसूद हा अहमदशहा मसूदचा मुलगा आहे. त्याने अनेक वर्षे तालिबान आणि सोव्हिएत युनियनच्या विरुद्ध लढाई केलेली आहे. या खोर्‍याच्या आजूबाजूच्या डोंगरांवर लढाई करणे कठीण आहे. त्यामुळे पंजशीर घेण्यासाठी तालिबानला पुष्कळ वेळ लागणार आहे. तालिबानच्या विरोधात होणार्‍या प्रतिकाराची लढाई येथूनच केली जाणार आहे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे